गोव्यात उद्यापासून "इफ्फी"

IFFI
IFFI

पणजी (गोवा) :  अनेक वलयांकित घोषणांमुळे इफ्फी 2017 चर्चेत आहे. इफ्फीस उद्या (या.२०) सुरवात होणार असून २८ रोजी समारोप होईल. आंतरराष्ट्रीय निर्माता महासंघाने ‘अ’ दर्जाने गौरवलेल्या या महोत्सवात 82  देशांचे 195 चित्रपट दाखवण्यात येणार असून 10 चित्रपटांचा जागतिक प्रिमिअर होणार आहे. 10 आशियाई आणि आंतरराष्ट्रीय प्रिमिअर तसेच 64 पेक्षा अधिक भारतीय प्रिमिअर या महोत्सवाचा भाग असतील.

झी पिक्चर्स आणि नमाह पिक्चर्स प्रस्तुत आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक माजिद माजिदी दिग्दर्शित 'बियाँड द क्लाऊड्स " या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होईल तर पाब्लो सेझर यांनी दिग्दर्शित केलेला आणि भारत आणि अर्जेंटिनाची संयुक्त निर्मिती असलेल्या "थिंकिंग ऑफ फिल्म" या चित्रपटाच्या जागतिक प्रिमिअरने महोत्सवाची सांगता होईल. चित्रपट महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला प्रसिद्ध अभिनेते शाहरुख खान खास पाहुणे म्हणून उपस्थित राहतील तर समारोप सोहळ्याला अभिनेते सलमान खान उपस्थित राहणार असून याव्यतिरिक्त, नामवंत चित्रपट व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय पाहुणे, मान्यवर आणि चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या महोत्सवाला उपस्थिती लावणार आहे.

21 नोव्हेंबर रोजी माध्यमे आणि प्रतिनिधी यांच्यासाठी चित्रपटांचे शो होणार असून प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या हस्ते इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्‌घाटनही यावेळी होईल. याच दिवशी इफ्फी 2017 कन्ट्री फोकस ऑन  कॅनडाचा मोठ्या दिमाखात प्रसिद्ध केनेडीअन कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होईल. कॅनडा सरकार आणि टेलिफिल्म कॅनडा, टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांच्या संयुक्त सहकार्याने कन्ट्री फोकस कॅनडाचे आयोजन करण्यात आले आहे.

इफ्फी 2017च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागासाठी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक पारितोषिक असून यावर्षीच्या15 सर्वोत्तम चित्रपटांमध्ये सुवर्ण आणि रौप्य मयूर पुरस्कारासाठी चुरस असेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षकांचे नेतृत्व प्रसिद्ध दिग्दर्शक मुझफ्फर अली करणार असून ऑस्ट्रेलियाचे महोत्सव दिग्दर्शक मॅक्सिन विलियम्सन, इस्रायलचे अभिनेते-दिग्दर्शक झाही ग्राड, रशियन छायाचित्रकार व्लादिस्लाव ओपेलिएनटस, इंग्लंडचे प्रोडक्शन डिझायनर रॉजर ख्रिस्तियन हे अन्य ज्युरी सदस्य असतील.

या महोत्सवात महिला दिग्दर्शकांचे सर्वाधिक (30 हून अधिक) चित्रपट दाखवण्यात येणार असून जगभरातील जुन्या जतन केलेल्या चित्रपटांचाही एक विभाग असून यात फ्रित्झ लँगचा मेट्रोपॉलिस आणि तार्कोव्स्कीचा सॅक्रिफाईस यासह अनेक प्रसिद्ध चित्रपटांचा यात समावेश आहे.

इफ्फी 2017 मध्ये अनेक गोष्टी प्रथमच होत असून चित्रपटांमधील सर्वाधिक लोकप्रिय हेरगिरीपट जेम्स बॉंडचा विशेष विभाग असेल. यात आघाडीच्या अभिनेत्यांनी रंगवलेल्या बॉण्डच्या व्यक्तिरेखांचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. याशिवाय, व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या सहकार्याने बायनेल कॉलेजच्या तरुण दिग्दर्शकांचे 4 चित्रपट या महोत्सवात दाखवले जातील. याबाबत व्हेनिस चित्रपट महोत्सवाचे संचालक आल्बेर्तो बार्बेरा म्हणाले कि इफ्फिने केलेल्या सहकार्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, जगभरातील तरुण चित्रपट दिग्दर्शकांना पाठिंबा दर्शवणारा हा प्रकल्प असून बायेनेल कॉलेज सिनेमाचे 4 चित्रपट सादर करण्याची संधी व्हेनिस चित्रपट महोत्सवाला यानिमित्ताने मिळाली आहे. मला खात्री आहे कि या प्रतिष्ठित इफ्फीचे प्रेक्षक या छोट्या चित्रपटांच्या दर्जाला आणि त्यांना दृश्य स्वरूपात आणण्याचा आमच्या दोन संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांना नक्की दाद देतील. उत्तम सिनेमांप्रती प्रेम आणि तरुण प्रतिभावान चित्रपट दिग्दर्शकांच्या आवडीच्या सामायिक भावनेवर आधारित आपले सहकार्य यापुढेही कायम राहील अशी मी इच्छा व्यक्त करतो.

2017 च्या या महोत्सवात मास्टर क्लासेस आणि पॅनल डिस्कशन व्यतिरिक्त व्हर्चुअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटीचे संमिश्र दर्शन घडेल, ज्यात मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऍटम इगोयाम, शेखर कपूर, नितेश तिवारी आणि फराह खान तसेच ऑस्कर विजेता साऊंड डिझायनर क्रेग मॅन सहभागी होतील.

इफ्फी २०१७ मध्ये प्रतिष्ठेचा 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईअर' पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना  तर जीवनगौरव पुरस्कार कॅनेडिअन दिग्दर्शक ऍटम इगोयाम यांना प्रदान केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com