स्वबळावर काम करणाऱ्या महिलांचा अभिमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

‘दगडी चाळ’, ‘पोस्टर बॉईज’, ‘चीटर’, ‘सतरंगी रे’ अशा अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनेत्री पूजा सावंत हिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ‘दगडी चाळ’ या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. महिला दिनानिमित्त ‘सकाळ’ने तिच्याशी साधलेला संवाद. 

महिला दिनानिमित्त काय सांगशील?
- करिअर करत असताना आलेल्या अडीअडचणींवर मात करून यश मिळविणाऱ्या महिलांचे अपार कौतुक वाटते. कारण या महिला अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून वाटचाल करत असतात. या वाटचालीतून प्रवास करणे किती कठीण असते याचा मला अनुभव आहे. त्यामुळे स्वबळावर काम करणाऱ्या महिलांचा मला अभिमान वाटतो. मात्र तरीसुद्धा महिलांच्या खंबीरतेविषयी शंका घेणाऱ्यांच्या मानसिकतेबाबत प्रश्‍न पडतो? 

चित्रपटसृष्टीत अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन मिळते या विषयी काय सांगशील?
- चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांना जास्त मानधन मिळणे ही गोष्ट खूप पूर्वीपासून चालत आहे. किंबहुना ती प्रथाच आहे. मात्र, आता बदलत्या काळानुसार चित्रपटसृष्टीतदेखील बदल झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टी आता उत्तुंग शिखरावर पोहोचली आहे. जेथे यश मिळते, तिथे या सर्व गोष्टी बदलतच असतात. अलीकडच्या काही चित्रपटांत अभिनेत्रीच चित्रपटाचा केंद्रबिंदू असतात. 

बॉलिवूडच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीविषयक चित्रपट कमी आहेत या विषयी तुझे काय मत आहे?
- पूर्वी मराठीत स्त्रीविषयक अनेक चित्रपट झाले फक्त ते प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोचले नाहीत. सध्या मराठीत स्त्रीविषयक चित्रपटांच्या अनेक स्क्रिप्ट तयार आहेत. मी देखील ‘लपाछपी’ नावाचा चित्रपट केला आहे. या चित्रपटाची पूर्ण धुरा माझ्या खांद्यावर होती. यामध्ये कोणताही स्टार कलाकार नव्हता. या चित्रपटाच्या वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडला. म्हणजेच अशा प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांना अधिक आवडतात. मात्र हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोचणे अधिक महत्त्वाचे आहे. चित्रपट प्रेक्षकांना आवडले तर अन्य कोणी काहीही करू शकत नाही.

मराठी चित्रपटसृष्टीमधील महिलांच्या वातावरणाविषयी काय सांगाल?
-  नाटक, मालिका वा चित्रपट, या सर्व माध्यमांच्या सेटवर महिलांसाठी वातावरण अत्यंत सुरक्षित आहे. या क्षेत्रात एका प्रोफेशनल टीमसोबत काम करत असाल, तर काहीच अडचण निर्माण होत नाही. प्रेक्षकांनी चित्रपटसृष्टीविषयीचा गैरसमज दूर करावा. चित्रपटसृष्टीत खूप प्रोफेशनल माणसे आहेत येथे महिलांविषयी काहीच अनपेक्षित घडत नाही, असा माझा अनुभव आहे.

चित्रपटसृष्टीत सौंदर्यासाठी अपडेट राहणे किती महत्त्वाचे वाटते?
- शरीर, सौंदर्य या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत. सौंदर्यासाठी किती आणि काय गोष्टी कराव्यात हे प्रत्येकाच्या हातात आहे. शेवटी सर्वांगीण विकास होणे हेच महत्त्वाचे वाटते.

Web Title: marathi news International Womens Day pooja sawant actress entertainment