'पॅडमन' 9 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

'पद्मावत' आणि 'पॅडमन'ची टक्कर टाळण्यासाठीच 'पॅडमन'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला 'पॅडमन' चित्रपट आता 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वी 'पॅडमन' चित्रपटाच्या प्रदर्शनाची 25 जानेवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता यामध्ये बदल करण्यात आला असून, 9 फेब्रुवारी ही नवी तारीख असणार आहे. 

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'पद्मावत' चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. नेमक्या त्याच दिवशी 'पॅडमन' चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, आता या चित्रटाचे प्रदर्शन 9 फेब्रुवारी केले जाणार आहे. त्यामुळे 'पद्मावत' आणि 'पॅडमन' हे आता एकाच दिवशी प्रदर्शित केले जाणार नाहीत. पॅडमन या चित्रपटात अक्षय कुमार, अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असणार आहे. 

तसेच 9 फेब्रुवारी रोजी मनोज वायपेयी यांचा 'अय्यारी' हा चित्रपटही प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे 'पॅडमन' आणि 'अय्यारी' यांच्यात टक्कर होणार हे निश्चित मानले जात आहे. 

दरम्यान, 'पद्मावत' आणि 'पॅडमन'ची टक्कर टाळण्यासाठीच 'पॅडमन'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Marathi news National news Entertainment akshay kumars film padman release postponed to february 9