'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' 

बुधवार, 14 मार्च 2018

महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' या चित्रपटाविषयी...

संघर्षमय आयुष्याचा हेलावून टाकणारा अनुभव  भौतिकशास्त्रातील महान शास्त्रज्ञ, कृष्णविवरांवरील संशोधनामुळं घराघरांत पोचलेले व गेली अनेक दशके विकलांग अवस्थेत असूनही आपल्या संशोधन आणि जगण्याच्या संघर्षामुळे सर्वांचेच प्रेरणास्थान बनलेले स्टिफन हॉकिंग गेले. कोणतीही हालचाल, बोलणे व लिहिणे शक्‍य नसूनही अविश्रांत संशोधनात गढलेल्या या महान शास्त्रज्ञाचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. 

स्टिफन हॉकिंग यांनी विपुल लेखन केले, भाषणे दिली. त्यांच्या जीनवसंघर्षावर आधारित "ट्रॅव्हलिंग टू इन्फिनिटी : माय लाइफ विथ स्टिफन' हे पुस्तक त्यांची पहिली पत्नी जेन यांनी लिहिले. याच पुस्तकावर बेतलेला "द थिअरी ऑफ एव्हरिथिंग' हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. एका उमद्या तरुणाचा अभ्यास, संशोधन व प्रेमप्रकरण व मोटर न्युरॉन या आजाराचं निदान झाल्यानंतर उलथापालथ झालेलं आयुष्य व त्यानंतर मृत्युवर मात करत मोठ्या धैर्याने स्टिफन यांनी सुरू ठेवलेले आपले अथक संशोधनकार्य असा प्रवास दिग्दर्शक जेम्स मार्श यांनी मांडला आहे.

'द थिअरी ऑफ एव्हरिथिंग'ची कथा सुरू होते केंब्रिज विद्यापीठात, स्टिफन (एडी रेडमायने) यांच्या तारुण्यापासून. स्टिफन साहित्याचा अभ्यास करणाऱ्या जेडीच्या (फेलिसिटी जोन्स) प्रेमात पडतात. गणित आणि भौतिकशास्त्रात त्यांना यांनी मोठी गती असते, मात्र संशोधनासाठीचा विषय निश्‍चित झालेला नसतो. कृष्णविवरांसंदर्भातील एक भाषण ऐकल्यानंतर स्टिफन यांना याच विषयात रस निर्माण होतो. विश्‍वाच्या निर्मितीमध्ये कृष्णविवरांचा मोठा वाटा असल्याचा दावा करीत आपल्या संशोधनाचा हाच विषय असेल, असं ते जाहीर करतात. संशोधनाचं काम सुरू असतानाच त्यांचे स्नायू असहकार पुकारतात. त्यांना चालणं कठीण होऊन बसतं. आपल्याला मोटार न्युरॉनचा आजार असल्याचं व बोलणं, गिळणं, श्‍वास घेणं व शरीराचा कोणताही भाग हलवणं शक्‍य होणार नसल्याचं त्यांना समजतं. आयुष्याची केवळ दोन वर्ष उरल्याचं निदान डॉक्‍टर करतात. स्टिफन यांचा डॉक्‍टरांना पहिला प्रश्‍न असतो, 'माझा मेंदू काम करेल का?' मेंदूवर लगेचच परिणाम होणार नसला, तरी भविष्यात काहीही होऊ शकतं, असं डॉक्‍टरांचं उत्तर असतं. कोणीही खचून जाईल, अशीच ही स्थिती. या परिस्थितीत जेन स्टिफन यांना साथ देते, त्याच्या घरच्यांना आम्ही एकत्र राहणार असल्याचं सांगत लग्नाचा प्रस्ताव ठेवते. दोघं विवाहबद्ध होतात. स्टिफन आपला संशोधन निबंध सादर करतात. कृष्णविवरामध्ये झालेल्या स्फोटामुळे (बिग बॅंग) विश्‍वाची निर्मिती झाल्याचा आपला जगप्रसिद्ध सिद्धांत मांडतात. याच काळात त्यांना चालणंही अशक्‍य होतं आणि व्हीलचेअरचा आसरा घ्यावा लागतो. स्टिफन आणि जेडी एका मुलाला जन्म देतात. आपल्या संशोधनावर लक्ष केंद्रित करीत कृष्णविवरांच्या दृश्‍यपरिणामांबद्दलचा निबंध ते प्रसिद्ध करतात आणि जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ म्हणून जगाला त्यांची ओळख होते. त्यांना दुसरी मुलगीही होते, मात्र स्टिफनला सांभाळताना आपलं संशोधन मागं पडत असल्यानं जेन निराश होते. ती मुलांचा पिऍनोचा शिक्षक जोनाथनच्या (चार्ली कॉक्‍स) प्रेमात पडते. ही गोष्ट स्टिफनच्या लक्षात येते, मात्र ते जोनाथनला भेटून जेनला तुझी गरज असल्याचं सांगतात. या काळात त्यांच्या तिसऱ्या अपत्याचा जन्म होतो. स्टिफन यांची सहायक म्हणून इलानी (मॅक्‍सिन पॅके) रुजू होते आणि ती लिखाणासाठी त्यांना मदत करू लागते. तिने तयार केलेल्या 'व्हाइस सिंथेसायझर'मुळं स्टिफन 'द ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम' हे पुस्तक लिहितात व हे पुस्तक जगातील सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरते. स्टिफन आता इलानीच्या खूप जवळ आलेले असतात आणि जेनला आपला संसार पुढं जाणार नाही, याची कल्पना येते. दोघं घटस्फोट घेतात. जेन आता जोनाथनबरोबर संसार थाटते. स्टिफन एका लेक्‍चरसाठी अमेरिकेत जातात. "आयुष्य कितीही खडतर असेल, तरी आपण काहीतरी नक्कीच करू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आयुष्य आहे तोपर्यंत आशा आहे,'' सांगत ते भाषण संपवतात. असहाय परिस्थितीत जगत असूनही हार न मानणाऱ्या, संशोधन कार्यातून कधीही निवृत्त न होण्याचा संकल्प केलेल्या या अवलियाचं सध्याचं आयुष्य,दिनक्रम दाखवत चित्रपट संपतो. 

 

दिग्दर्शकानं हा गंभीर विषय हलक्‍या फुलक्‍या प्रसंगांतून पुढं नेला आहे. स्टिफन हॉकिंग यांची जीवनाप्रती असलेली ओढ, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि संशोधकवृत्ती दिग्दर्शक अनेक प्रसंगातून अधोरेखित करतो. पार्श्‍वसंगीत, छायाचित्रण व अभिनय या आघाड्यांवर चित्रपट दमदार कामगिरी करतो.

Web Title: marathi news stephen hawking the theory of everything movie