व्हॅलेंटाईन डे स्पेशल; अभिनेत्री मृणाल दुसानिस सांगतेय लग्नानंतरची लव्ह स्टोरी...

शुक्रवार, 9 मार्च 2018

जसा विचार मी लाईफ पार्टनर बाबत केला होता, नीरज तसाच आहे. मी धांदरट, वेंधळेपणा करते तरी तो इतक्या संयमाने आणि समूजतदारपणे सगळं सांभाळून घेतो....

अभिनेत्री, अभिनेता म्हटले की यांच्या आयुष्यात एक वा अनेक लव्ह स्टोरी असेलच, लग्न झालं असेल तर लव्ह मॅरेज झालं असेल..असे आपण गृहीत धरतो. पण लोभस चेहऱ्याच्या या अभिनेत्रीच्या लग्नाचा थाट सर्वसामान्यांप्रमाणेच पार पडला. अगदी लग्नासाठी आई-वडीलांनी मुलीच्या लग्नासाठी मुलं बघायला सुरवात केल्यापासून ते चहा पोह्यांच्या कार्यक्रमापर्यंत सगळं एखाद्या सामान्य मुलीचे अरेंज्ड मॅरेज जमतं तसंच... हीच लग्नानंतरची लव्ह स्टोरी सांगतेय अभिनेत्री मृणाल दुसानिस...

माझ्या आयुष्यात लग्नानंतरची लव्ह स्टोरी आहे. नीरज आणि माझं अरेंज्ड मॅरेज झालंय. लग्नाआधी मी काही कुणाला डेट केलं नाही. त्यामुळे व्हॅलेटाईन डे साजरा वगैरे मी कधी केलाच नाही. नीरज हा अमेरीकेला जॉब करतो. माझ्या आई-वडीलांवर लग्नासाठी मुलगा बघण्याबद्दल मी सोपवलं होतं. अगदी टीपिकल पद्धतीने कांदे-पोह्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा आम्हाला नीट एकमेकांशी बोलता आलं नव्हतं. कारण बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर नीरज अमेरीकेला निघून गेला. आमची पहिली रीतसर भेट तेव्हा झाली जेव्हा मी एका कार्यक्रमानिमित्ताने लॉस एंजेलिसला गेले होते. तो मला बघायला आलेला तिसरा मुलगा होता पण त्याच्याशी भेटून, बोलून मला त्याचा स्वभाव खुप आवडला.

mrunal dusanis

आमच्या लग्नाला येत्या २५ फेब्रुवारीला २ वर्ष पुर्ण होतील. पण अजूनही आम्ही एकमेकांना डेट करतोय इतका असा फ्रेशनेस आमच्या नात्यात मला जाणवतो. त्याचा साधेपणा मला सगळ्यात जास्तं भावतो. तो अमेरीकेत राहत असला तरी तो पुर्ण सदाशिव पेठी आहे असं म्हटलं तरी चालेल. लग्नं ठरलं म्हणून मी माझ्या मैत्रींणीसोबत पार्टी करत होते. तेव्हा त्याचा फोन आला. मैत्रीणींनी माझ्या हातून फोन हिसकावत त्याच्याशी तो अमेरीकेचा म्हणून इंग्रजीत बोलायला लागल्या. पण त्याने सगळी उत्तर मराठीतच दिली. त्याचा हा साधेपणा खरच भावणारा आहे. जसा विचार मी लाईफ पार्टनर बाबत केला होता, नीरज तसाच आहे. मी धांदरट, वेंधळेपणा करते तरी तो इतक्या संयमाने आणि समूजतदारपणे सगळं सांभाळून घेतो की मी शांत होते. यामुळे लग्नानंतर मला आधी भेटायला हवं होतं वगैरे कधीच डोक्यातही आलं नाही. 

mrunal dusanis

नीरजनं एका खर्‍या मित्रासारखं मला खुप समजून घेतलंय. नात्यांना महत्व देणे हे त्याला उत्तम जमतं. तो आताही कामानिमित्त अमेरीकेत राहतो आणि मी इथे. पण प्रत्येकवेळी मला विचारात घेऊन वागतो. मला गायला आवडतं. ज्याच्याकडे अभिनयामुळे जरा दुर्लक्षच झालं. पण नीरजने मला नेहमी गाण्यासाठी प्रवृत्त केलंय. घरकामात मी जरा कमी पडते. पण अमेरीकेला गेले की तो मला सगळी मदत करतो. मला तर नेहमीच असं वाटतं की नीरज मला लागलेला जॅकपॉट आहे. मी अजूनही त्याच्या प्रेमात पडत आहे. 

Web Title: marathi news valentine day special actress mrunal dusanis love story shiwani khorgade