मराठी गायिकेची इंडो-झेक ‘धारा’

मराठी गायिकेची इंडो-झेक ‘धारा’

मुंबईः संगीताला भाषा नसते. त्याला ना भौगोलिक बंधने असतात, ना संस्कृतीच्या वा सामाजिक सीमा असतात. संगीताचे सूर वाऱ्याप्रमाणेच स्वतंत्र, मोकळे, खुले. याची प्रचिती पुन्हा एकदा आली ती एका द्वैभाषिक द्वंद्वगीतातून. ‘सूर से अपनी बाते’ सांगणारे, ‘सुनती हूं उस धारा में धून तेरी नयी नयी’ असे सांगणारे हे गीत रचले आहे एका झेक संगीत दिग्दर्शकाने आणि गायले आहे त्याच्यासह एका भारतीय-मराठी गायिकेने. त्या झेक संगीत दिग्दर्शक-गायकाचे नाव आहे इरका मुखा आणि या पहिल्यावहिल्या इंडो-झेक द्वंद्वगीताची गायिका आहे अनघा ढोमसे.

संगीतप्रेमी तरूणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या म्युझिक डिजिटल अॅप्सवरील  ‘हळुवार अंतरीच्या…’, ‘सावरते…’ या गीतांमुळे रसिकप्रिय झालेल्या अनघाचे हे इंडो-झेक गीत असलेल्या अल्बमचे नाव आहे - ‘पार्टनर इन टाईम’. या युरोपियन सांगितिक ‘पार्टनर’बरोबर गाणे करण्याचा योग कसा जुळून आला याबाबत ती सांगते - “मी यापूर्वी त्याच्या एका गाण्यात ‘बँकिंग व्होकल’ दिलं होतं - म्हणजे गाण्यातला आलाप, एखादी हार्मनी वा गाण्याची एखादी ओळ गाणे असं. तेव्हापासूनची आमची ओळख.

इंटरनेटवरून आम्ही सातत्याने गाण्याविषयी चर्चा करायचो. मी नवीन एखादं गाणं केलं की त्याला पाठवायचे. तो त्याची एखादी अनवट नवी चाल मला पाठवायचा. तो भारतात येतो तेव्हा आवर्जून माझ्या घरी येतो. माझा रियाज त्याने पाहिलाय. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याला हिंदुस्तानी संगीत आणि भारतीय संस्कृती याबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्याला असं भारतीय संगीतावर आधारलेलं एखादं गाणं करायचं होतं. त्याबद्दल त्याने मला विचारलं. मलाही ती संकल्पना फार आवडली. तो म्हणाला, की थोडंसं झेक भाषेत गावं लागेल. ते आव्हानच होतं. पण मी स्विकारलं.

पण हे गाणे रेकॉर्ड कसे झाले? "तो तिथं झेक प्रजासत्ताकात. मी मुंबई-पुण्यात. तेव्हा आम्ही सगळं ऑनलाईनच काम केलं. त्यातलं झेक भाषेत जे होतं ते गाऊन, रेकॉर्ड करून मी त्याला पाठवायचे. कुठं उच्चारात वगैरे गफलत झाली की तो कळवायचा. मी पुन्हा तसं रेकॉर्ड करून पाठवायचे. गाण्यातला जो हिंदी भाग आहे तो मी संगीत दिग्दर्शक राहुल भावसार यांच्याकडून रेकॉर्ड करून घेतला.

भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृती यांचा संगम असलेले हे गाणे. यापूर्वी अनेकांनी असे प्रयोग केले आहेत. पण एका झेक संगीतकाराला असे एखादे गाणे करावेसे वाटावे ही बाब अधिक महत्त्वाची. अनघा सांगते, “यातून एक बाब स्पष्ट होते, ती म्हणजे युरोपातल्या नव्या पिढीतील संगीतकारांनाही हिंदुस्तानी संगीताबद्दल ओढ आहे. अतिशय सोलफूल असं हे गाणं आहे. ते गाताना मला फार काही वेगळं नाही वाटलं. पण गाताना तयारी मात्र भरपूर करावी लागली. आता याचा व्हिडिओ देखील ‘अनारका’ या आमच्या यूट्यूब पेजवर रिलीज झाला आहे. त्यांच्या देशात गाणं रिलीज करण्याच्या आधी त्या गाण्याच्या शब्दांचा व्हिडिओ करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आम्ही तसा व्हिडिओ बनवला.

इरका यांनी या आधी बॉलिवूडमध्ये काम केले आहे. २०१२ मध्ये आलेल्या म्योहो या एका वेगळ्या चित्रपटासाठी त्यांनी सांगितिक योगदान दिले होते. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. ‘पार्टनर इन टाईम’ या अल्बममधील झेक भाषेतील गीत इरका यांचे आहे. त्याचे शब्दार्थ आपल्याला समजत नसले, तरी त्याची चाल मात्र मोहवून जाते. या गीतातील हिंदी काव्यलेखन केले आहे गीतकार शिवकुमार ढाले यांनी. हे सारेच ऐकण्यासारखे आहे.

आजही संगीतक्षेत्रात नवे नवे प्रतिभावान कलाकार येत आहेत. त्यांच्यासाठी आजच्या डिजिटल युगाने कशा प्रकारच्या संधी निर्माण केल्या आहेत, जुन्या ‘म्युझिक-सिस्टिम’चा म्हणजेच येथील सांगितिक व्यवस्थेचा अडथळा पार करून ते कसे जागतिक व्यासपीठावर जाऊ शकतात याचे एक छानसे उदाहरण म्हणूनही ‘अनारका’ म्हणजेच अनघा आणि इरका यांच्या या गाण्याकडे आणि या प्रयोगाकडे पाहता येईल.

(संपादनः पूजा विचारे)

Marathi Singer Anagha Dhomse now indo zec albums

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com