नाटकांच्या वेळा बदलणार!

नाटकांच्या वेळा बदलणार!

पुणे - नाट्यरसिकांना गैरसोईची ठरणारी नाट्यप्रयोगाची रात्री साडेनऊची वेळ बदलून ती रात्री आठ वाजताची करण्यास महापालिकेने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेच्या रंगमंदिरांमधील कार्यक्रमांची दुपारची व सायंकाळची सत्रेही अलीकडे येणार आहेत. एक सप्टेंबरपासून हा बदल अमलात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली. मनोरंजन कार्यक्रमांच्या कालबाह्य झालेल्या वेळापत्रकामधील बदलांच्या निकडीकडे सर्वप्रथम "सकाळ‘ने लक्ष वेधले होते व त्या बदलांसाठी नियोजनबद्ध पाठपुरावाही केला. नव्या वर्षात एक जानेवारीपासून कार्यक्रमांसाठी रंगमंदिरांचे बुकिंगही ऑनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहे. 

मध्यरात्री उशिरा आडवेळी संपणाऱ्या नाट्यप्रयोग आणि कार्यक्रमांमुळे रसिकांना तोंड द्याव्या लागणाऱ्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. परिणामी रात्रीच्या खेळांना प्रेक्षकांचा प्रतिसाद कमालीचा रोडावला आहे आणि त्यामुळे मनोरंजन व्यवसायातील अर्थकारणच धोक्‍यात आले आहे. या दोन्ही बाजूंनी चिंताजनक प्रश्‍नाला हात घालीत "सकाळ‘ने तीन दिवस विशेष वृत्तमालिका प्रकाशित केली. रसिक व मनोरंजन व्यवसायातील विविध घटकांमध्ये या विषयावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी "सकाळ‘ने महापालिका प्रशासनाबरोबर संवाद घडविण्यासाठी पुढाकारही घेतला. 

या सगळ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत महापौर प्रशांत जगताप यांनी एक विशेष बैठक नुकतीच बालगंधर्व रंगमंदिरात घेतली. अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप व प्रशासन अधिकारी भारतकुमार कुमावत यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ज्येष्ठ नाट्यसमीक्षक मंगेश तेंडुलकर, नाट्यनिर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, माजी अध्यक्ष भाग्यश्री देसाई, नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष अविनाश देशमुख, मध्यवर्ती नाट्य परिषदेचे सुनील महाजन, निर्माते विजय जोशी, शशिकांत कोठावळे, अप्पा कुलकर्णी, नाना मोहिते, वरुण कांबळे, नाट्यव्यवस्थापक मोहन कुलकर्णी, समीर हंपी, मराठी वाद्यवृंद संचालक प्रकाश भोंडे, एकपात्री कलावंत संतोष चोरडिया, ऑर्केस्ट्रा कलावंत जितेंद्र भुरूक आदी मनोरंजन व्यावसायिक चर्चेत सहभागी झाले. या वेळी प्रयोगांच्या वेळापत्रकामधील बदलाबरोबरच मनोरंजन व्यवसाय व रंगमंदिरे या संदर्भातील अन्य महत्त्वाच्या विषयांवरही विचारविनियम झाला. 

एक सप्टेंबरपासून महापालिकेच्या रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोग वा अन्य कार्यक्रमांसाठी दुपारी बारा ते तीन, सायंकाळी चार ते सात आणि रात्री आठ ते अकरा अशा सत्रांच्या वेळा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. एक जानेवारीपासून कार्यक्रमांसाठी रंगमंदिराच्या तारखा "ऑनलाइन‘ पद्धतीने वितरित केल्या जाणार आहेत. 
 

या पुढे राजकीय कार्यक्रमांना "बालगंधर्व‘ नाही 
केंद्र शासन, राज्य शासन व स्वतः महापालिका यांच्याद्वारे आयोजित अधिकृत कार्यक्रमांखेरीज अन्य राजकीय, सामाजिक वा अन्य प्रकारांच्या खासगी सोहळ्यांसाठी या पुढे बालगंधर्व रंगमंदिरातील नाटक किंवा सांगीतिक मैफलींच्या पूर्व आरक्षित तारखा काढून घेण्यात येणार नाहीत, असा निर्णय बैठकीत झाला. मात्र राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या सहभागाच्या किंवा तत्सम असाधारण कार्यक्रमांचा यासाठी अपवाद करावा लागेल, असेही महापौरांनी याबाबतीत स्पष्ट केले. 
 

अन्य महत्त्वाचे निर्णय 
- मुख्य रंगमंदिराखेरीजची पालिकेची अन्य प्रेक्षागृहे कार्यक्रमांच्या तालमींसाठी सवलतीत 
- नाटकांसाठीचे रात्रीचे सत्र मागणीविना रिकामे असल्यास लावणीला मिळणार 
- सकाळी नऊचे सत्र या पुढे उपलब्ध नसल्याने बालनाट्ये नियमित सत्रात 
- मनपा व खासगी शाळा, शिक्षण संस्थांच्या स्नेहसंमेलनासाठी त्या त्या भागातील नाट्यगृहेच फक्त उपलब्ध 
- कॅंटीन व पार्किंग रास्त दरातच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com