सत्य घटनेवर आधारीत मर्दानी 2

सत्य घटनेवर आधारीत मर्दानी 2

मुंबई : आपण कितीही आधुनिकतेच्या गप्पा मारत असलो, महिलांच्या सक्षमीकरणावर बोलत असलो तरी आजही कुठे ना कुठे महिलांवरील अत्याचाराच्या व त्यांच्यावरील बलात्काराच्या घटना घडताना दिसतात. काही पुरुषी अहंकारी नराधमांच्या वासनेला त्या बळी पडताना दिसतात. अशीच एक घटना राजस्थानमधील कोटा शहरात घडलेली होती. त्याच सत्य घटनेवर आधारित ‘मर्दानी २’ हा चित्रपट आहे. 

राणी मुखर्जीने या चित्रपटात मुख्य भूमिका अर्थात शिवानी रॉय नावाच्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ही शिवानी धाडसी, कर्तव्यदक्ष आणि कणखर अशी पोलिस अधिकारी असते. आता मुंबईतून तिची बदली राजस्थानातील कोटा या शहरात झालेली असते. तेथे एका तरुणीवर बलात्कार होतो आणि नंतर तिचा खून करून तिला एका गटारात फेकण्यात येते. या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी शिवानीवर असते. हा तपास करीत असतानाच आणखीन एक बलात्काराची घटना आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असतात. पोलिस आपल्या परीने तपास करीत असतात. जनसामान्य पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर बोट ठेवतात. त्यातच शिवानीला पोलिस खात्यातील अंतर्गत कुरबुरीला तोंड द्यावे लागते आणि अशातच तिच्या बदलीचा फतवा निघतो; परंतु काही तासांचा अवधी तिच्याकडे असतो आणि या कालावधीतच महिलांना अशा क्रूरतेने छळणाऱ्या नराधमाला पकडायचेच असा चंग ती बांधते. त्यामध्ये तिला कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो... ती त्या नराधमापर्यंत कशी पोहोचते, या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे या चित्रपटात आहेत.

गोपी पुराथन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि पटकथा त्यांनीच बांधली आहे. राणी मुखर्जी, विशाल जेठवा अशा काही कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. विशालची भूमिका नकारात्मक आहे आणि त्याने त्या भूमिकेमध्ये चांगलेच रंग भरलेले आहेत. राणी मुखर्जीचा अभिनयही दमदार आहे. शिवानी रॉय या रुबाबदार आणि कर्तव्यदक्ष अशा पोलिस अधिकाऱ्याची भूमिका तिने उत्तम साकारली आहे. धाडसी आणि धडाकेबाज अशी ही भूमिका आणि तिला योग्य न्याय देण्याचा राणीचा प्रयत्न आहे. चित्रपटातील संवादही दमदार आहेत. चित्रपटातील एकूणच घटनाक्रम पाहता अंगावर शहारे येतात. विशेष म्हणजे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता लागते.

दिग्दर्शकाने चित्रपटातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याचा तो प्रयत्न सफल झाला आहे. २०१४ मध्ये आलेल्या ‘मर्दानी’ या चित्रपटाची कथा गोपी पुराथन यांनी लिहिली होती आणि आता त्यांनी ‘मर्दानी २’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. पटकथा व संवादलेखनही त्यांचेच. त्यांनी ही कथा कुठेही फापटपसारा न करता अगदी थोडक्‍यात मांडली आहे. मनाला भिडणारी आणि विचार करायला लावणारी आहे. 

web title : mardani 2 review

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com