'अगडबम’चा सिक्वेल लवकरच होणार प्रेक्षकांवर भारी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय यश उमटवले होते आणि आता पुन्हा एकदा दमदार अभिनय व वैचारिक कथानकसह ‘माझा अगडबम‘ प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी सज्ज झाला आहे.

सिनेमंत्र प्रॉडक्शन आणि सम्राज टॉकीज ६ जुलै, २०१८ ला ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करीत आहेत.

रितेश देशमुखच्या 'लई भारी' सारखी दमदार व उत्तम कलाकृती देणाऱ्या, शालिनी ठाकरे यांनी आपले नवे उद्यम ‘सम्राज टॉकीज’ विषयी बोलताना सांगितले, “सम्राज टॉकीजमागील मूळ कल्पना ही दर्जेदार मराठी साहित्याला प्रोत्साहन देणे आहे. जे उत्तम प्रकाशन अभावी हरवत चालले आहे.”

सुपरहिट ‘अगडबम’ चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा झाल्यापासून, चाहते उत्सुकतेने या भागाच्या प्रतिक्षेत आहेत. गृहिणीची भूमिका साकारत तृप्ती भोईर व तिच्या पतीची भूमिकेत सुबोध भावे, या चित्रपटातून प्रेक्षकांना एका सुखद आणि भावनिक सफारीचा अनुभव देतील.

ही कथा आपणास एक मुलगी, सून, व बायको म्हणून तिच्याकडून असणाऱ्या अपेक्षांना पतीच्या पाठींब्यासह सामोरी जाणाऱ्या नायिकेच्या विविध अडचणी आणि विनोदाची सफर घडविते. एका अलौकिक विनोदाची झालर असणारी ही कथा दिग्दर्शिका तृप्ती भोईर या चित्रपटातून मांडत आहेत.

‘माझा अगडबम ‘ चित्रपटात तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, तानाजी गलगुंडे आणि डॉ. विलास उझवणे अशा दमदार कलाकारांची फळी असून खुद्द तृप्ती भोईर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तृप्ती भोईर फिल्म्स, सिनेमंत्र आणि सम्राज टॉकीज निर्मित ‘माझा अगडबम‘ ६ जुलै, २०१८ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maza Agadbamb sequel of Agadbamb marathi movie