#MarathiBiggBoss बिग बॉस विजेत्या मेघाला मिळाले 'हे' बक्षिस...

सोमवार, 23 जुलै 2018

अभिनेत्री मेघा धाडे हिने मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. ही स्पर्धा जिंकल्यावर तिला 18 लाख 60 हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले, तर निर्वाणा लिजर रिअॅलिटी यांच्याकडून खोपोली येथे सिटी ऑफ म्युझिक या गृहप्रकल्पातील घर बक्षिस म्हणून मिळाले. तर बिग बॉस स्पर्धेत तिसरी आलेली स्मिता गोंदकर हिला जेमिनी ऑईल यांच्याकडून उत्कृष्ठ आरोग्यासाठी बक्षिस मिळाले.  

मुंबई : गेले 3 महिने गाजत असलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'मराठी बिग बॉस'ची काल (ता. 22) धुमधडाक्यात सांगता झाली. तीन महिने चालू असलेल्या या खेळात सुरूवातीपासूनच कोण कलाकार सहभागी असतील, बिग बॉसचे घर कसे असेल या बाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. कार्यक्रम चालू झाल्यावर प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीला भरभरून प्रेम दिले, विजेता कोण होणार याचे अंदाज बांधले. आणि पाहता पाहता काल या मराठी बिग बॉसचा विजेता घोषित झाला. अभिनेत्री मेघा धाडे हिने मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती होण्याचा मान पटकावला. ही स्पर्धा जिंकल्यावर तिला 18 लाख 60 हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले, तर निर्वाणा लिजर रिअॅलिटी यांच्याकडून खोपोली येथे सिटी ऑफ म्युझिक या गृहप्रकल्पातील घर बक्षिस म्हणून मिळाले. तर बिग बॉस स्पर्धेत तिसरी आलेली स्मिता गोंदकर हिला जेमिनी ऑईल यांच्याकडून उत्कृष्ठ आरोग्यासाठी बक्षिस मिळाले.  

megha

बिग बॉस मराठीच्या या पहिल्या पर्वात प्रथम 15 कलाकार स्पर्धक सहभागी झाले होते. त्यानंतर तीन स्पर्धक हे वाईल्ड कार्ड एन्ट्रीने घरात आले. पर्वाच्या अंतिम सोहळ्यापर्यंत मेघा धाडे, पुष्कर जोग, सई लोकूर, स्मिता गोंदकर, आस्ताद काळे, शर्मिष्ठा राऊत हे कलाकार पोहोचले. गेले 100 दिवस 150 कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत हे स्पर्धक राहिले. करमणूकीचे इतर कोणतेही साधन नसताना एकमेकांचे स्वभाव, हेवेदावे, वाद-विवाद, तडजोड करत या स्पर्धकांना या घरात रहायचे होते. या सर्वावर मात करत मेघाने ही स्पर्धा निर्विवाद जिंकली. अंतिम सोहळ्यात सहा स्पर्धक एक एक करत बाहेर पडले. अखेरीस मेघा धाडे व पुष्कर जोग यांच्यात ही स्पर्धा रंगली, पण प्रेक्षकांच्या मतानुसार मेघाने सर्वाधिक मतं मिळवत हा कार्यक्रम जिंकला.     

bigg boss finalist

बिग बॉस मराठीच्या घराने पहिल्या दिवसापासून अनेक नाती घडताना बघितली, तर जसे दिवस सरत गेले तशी नाती बदलताना, बिघडताना, त्यांच्यामध्ये कटुता येताना बघितले. पण या प्रवासात खुर्ची सम्राट या टास्कमुळे घरामध्ये दोन ग्रुप झाले, त्यानंतर एक ग्रुप शेवटपर्यंत टिकला तर दुसऱ्या ग्रुपला गळती लागली. या घरामध्ये पुरूषांनी कधी दादागिरी केली, पण या घरातल्या मुली सगळ्यांना पुरून उरल्या. बिग बॉस मराठीचे घर प्रत्येक सदस्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. या घराने आऊची माया अनुभवली, थत्तेची थत्तेगिरी प्रेक्षकांना खूप आवडली, सुशांतचं रडणं पाहिलं, मेघाचं या घरावरच आणि कार्यक्रमावरचं, किचनवरच प्रेम पाहिलं आणि तिची बडबड देखील ऐकली. तसेच राजेशचा अज्ञातव्यास पाहिला, जुईची चीडचीड आणि तक्रारी ऐकल्या, पुष्कर आणि सईची मैत्री पाहिली, पुष्करची टास्क दरम्यानची जिद्द बघितली आणि बघता बघता 18 सदस्यांचा प्रवास 6 जणांवर येऊन पोहोचला व अखेरीस मेघा जिंकली.

megha wins

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी मेघाला मिळाली आणि आता ती या पहिल्या पर्वाची विजेती ठरली त्याबद्दल ती म्हणाली, “मी अनेक वर्षांपासून बघितलेले स्वप्न आज पूर्ण झालं त्याचा मला खूप आनंद होत आहे. कलर्स मराठी आणि इंडेमॉलटीमची मी आभारी आहे की, त्यांनी मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा भाग होण्याची संधी मिळाली आणि आता मी हे पर्व जिंकले आहे यावर मला विश्वासच बसत नाहीये. या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकले, बरचं काही कमवलं आहे. हे 100 दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासामध्ये मला तीन जीवाभावाचे मित्र मिळाले पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा. प्रवास अप्रतिम होता असचं मी म्हणेन”.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाबद्दल निवेदक महेश मांजरेकर म्हणाले, “बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच पहिल पर्व अतिशय छानरीत्या पार पडलं, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या पर्वाला मिळालं. मेघा, पुष्कर आणि सई यांची तिगडी पुढे जाईल असं मला पहिल्यापासून वाटलं होतं. मेघा अत्यंत हुशार खेळाडू आहे. मेघाकडून कुठली चूक झाली तर तिला माफी मागायला कधीच लाज वाटली नाही, ती प्रेमाने प्रेक्षकांची मने जिंकत गेली, ती या कार्यक्रमामध्ये पूर्ण अभ्यास करून आली होती. मेघाचं हळूहळू प्रेक्षकांबरोबरच नातं खूप भक्कम होतं गेलं आणि तिने विजेतेपद पटकावले असं मी म्हणेन.''

Web Title: megha dhade winner is winner of marathi bigg boss wins 18 lakhs 60 thousand