#MeToo : दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर बलात्काराचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नाव न सांगण्याच्या अटीवरुन एका महिलेने सुभाष घई यांनी शूटींगदरम्यान अमली पदार्थाचे सेवन करुन आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे.

'दिग्दर्शक सुभाष घई यांनी माझ्यावर बलात्कार केला,' असा थेट आरोप एका महिलेने केला आहे. बॉलिवूडचे 'शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई या आरोपाने आता 'मी टू'च्या वादळात आले आहे. तनुश्री दत्ताने तिच्यासोबत झालेल्या गैरवर्तवणुकी विरोधात आवाज उठविल्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविला. आतापर्यंत चांगूलपणाचा मुखवटा घेऊन मिरवत असणारी अनेक नावे पुढे आली आहेत. बॉलिवूडमधील संस्कारी बाबूजी आलोकनाथ, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल, साजिद खान यांच्यावर लैंगिक गैरवर्तवणुकीचे आरोप झालेत. यात सुभाष घई हे आणखी एक नाव आता सामिल झालं आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवरुन एका महिलेने सुभाष घई यांनी शूटींगदरम्यान अमली पदार्थाचे सेवन करुन आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. लेखिका महिमा कुकरेजाने सोशल मिडीयावर एका पोस्टच्या माध्यमातून त्या महिलेची व्यथा मांडली आहे. ही महिला सुभाष घई यांच्या कंपनीत काम करत होती. 73 वर्षीय सुभाष घई यांनी हे आरोप फेटाळले असून संबंधित महिलेविरुध्द मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. 

घई यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने म्हटले आहे की, 'ते मला गाण्यांच्या रेकॉर्डींगसाठी घेऊन जात असत. कधी कधी तर ते मला काही पुरुष सहकाऱ्यांसोबत उशीरापर्यंत बसवून ठेवत असत. काही वेळा मी ऑटोकरुन घरी जायचे तर काही वेळा ते मला घरी सोडण्यासाठी येत. तेव्हा गाडीत ते माझ्या मांडीवर हात ठेवत. मी अमुक काम चांगले केले आहे असे म्हणत मला मिठी मारण्याचा प्रयत्न करत. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या लोखंडवाला येथील टू बीएचके फ्लॅटवर बोलावले. तिथे ते सिनेमाची स्क्रिप्ट ऐकण्यासाठी अभिनेत्रींना तिथेच बोलावतात असे त्यांनी सांगितले. मी गेले तेव्हा ते त्या टूबीएचके फ्लॅटमध्ये एकटेच होते. आम्ही स्क्रिप्टवर काम करण्यासाठी बसलो तेव्हा यावर बोलण्याऐवजी ते 'लोक कशाप्रकारे इंडस्ट्रीमध्ये त्यांना चुकीचं समजतात आणि मीच एकटी आहे जी त्यांना समजून घेते' याविषयावर बोलू लागले. ते माझ्याकडून सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी माझ्या मांडीवर डोकं ठेवलं. त्यानंतर त्यांनी माझं जबरदस्तीने चुंबन घेतलं. मी घाबरले आणि तिथून निघून गेले. मला जॉबची गरज होती, माझ्या फॅमिलासाठी मला जॉब सोडता येत नव्हता.

एक दिवस म्युझिक सेशन झाल्यानंतर त्यांनी दारु पिण्याचा बेत आखला. मलाही त्यांनी दारु प्यायला लावली. त्यानंतर त्यांनी मला कारमध्ये बसविले, ते मला घरी सोडणार असे मला वाटले. पण गाडी दुसऱ्याच दिशेने वळल्यावर माझ्या लक्षात आले की ते मला दुसरीकडे घेऊन जात आहे. त्यांनी माझ्या पेयात काही तरी अमली पदार्थ मिसळला होता, ज्यामुळे मला गुंगी येत होती. त्यांनी मला एका हॉटेलमध्ये नेले आणि माझ्यावर अतिप्रसंग केला. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तर रुममध्ये सगळी अवस्था पाहून मी रडले. त्यांनी मला घरी सोडले. पण काही दिवस मी ऑफिसला जाणं टाळले, मला ऑफिसमधून एक दिवस फोन आला की 'आता जर तुम्ही ऑफिसला आला नाहीत तर या महिन्याचा पगार तुम्हाला मिळणार नाही.' त्यामुळे मी पुन्हा कामावर रुजू झाले. पण आठवडाभरातच मी राजीनामा दिला आणि पुन्हा कधी त्या ऑफिसला गेले नाही, सुभाष घईंना भेटलेही नाही.'   
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MeToo One Ex woman employee of Subhash Ghai Accuses Him For Rape