चित्रपट महोत्सवातून जाणिवांचा विस्तार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

‘‘लोकप्रिय गोष्टींवर कथा गुंफून सिनेमे करताना घेतली जाणारी सिनेलिबर्टी बऱ्याचदा धोकादायक ठरते. तंत्रज्ञानाची बॅट स्वस्त झाल्याने प्रत्येकालाच सचिन तेंडूलकर झाल्यासारखे वाटते. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.’’

कोल्हापूर - ‘तंत्रज्ञानाचा वापर करून सिनेनिर्मितीचे पेव फुटले असताना बायोपीकच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टीही घडू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जाणिवा विस्तारण्यासाठी चित्रपट महोत्सवांचे योगदान येत्या काळातही महत्त्वाचे राहणार आहे,’ असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. 

येथील सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमात संकलक अभिजित देशपांडे यांचा चित्रमहर्षी आनंदराव पेंटर पुरस्काराने गौरव झाला. 

डॉ. आगाशे म्हणाले, ‘‘लोकप्रिय गोष्टींवर कथा गुंफून सिनेमे करताना घेतली जाणारी सिनेलिबर्टी बऱ्याचदा धोकादायक ठरते. तंत्रज्ञानाची बॅट स्वस्त झाल्याने प्रत्येकालाच सचिन तेंडूलकर झाल्यासारखे वाटते. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.’’ अभिजित देशपांडे यांनी पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सिनेनिर्मितीत पडद्यामागे राबणाऱ्या तंत्रज्ञांचा गौरव करण्याची येथील परंपरा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.’’ 

कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविकात महोत्सवाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ‘अभिरुचीसंपन्न प्रेक्षक वाढवण्यासाठी ही चळवळ सुरू असून येत्या काळातही ती नेटाने सुरू राहिल,’ असे त्यांनी सांगितले.

यावेळी दिग्दर्शिका सुमित्रा भावे, व्ही. बी. पाटील, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, नितीन वाडीकर, दिलीप बापट आदी उपस्थित होते. ऐश्वर्या बेहेरे यांनी सूत्रसंचालन केले.

‘माय मराठी’ पुरस्कार
  ‘मायमराठी’ विभागांतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण झाले. पुरस्कार असे...
  सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘दिठी’   ० सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : करण चव्हाण आणि विक्रम पाटील (चित्रपट : इमेगो) 
  सर्वोत्कृष्ट अभिनेता : किशोर कदम (दिठी) 
  सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ऐश्वर्या धायदार (दिठी) 
  सर्वोत्कृष्ट पटकथा : अमर भारत देवकर (म्होरक्‍या) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohan Agashe comment