motichoor chaknachoor review : टिपीकल फॉर्म्युला; फ्रेशनेस हरवला

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

मुंबई : परदेशातील वस्तू... तेथील जीवनशैलीचे आकर्षण सगळ्यांना आहे. विशेष करून छोट्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याबद्दल काहीसे विशेष वाटत असते. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऍना ऊर्फ अनिता (अथिया शेट्टी) हिला परदेशाचे भलतेच आकर्षण असते. ती आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथे राहात असते. तिला लग्न करायचे असते पण लंडन किंवा अमेरिकेत राहणाऱ्या तरुणाशी. त्यामुळे तिला आलेली स्थळे ती एकेक करून नाकारत असते. त्यांच्याच शेजारी राहणारे त्यागी कुटुंब.

मुंबई : परदेशातील वस्तू... तेथील जीवनशैलीचे आकर्षण सगळ्यांना आहे. विशेष करून छोट्या छोट्या शहरांतील मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याबद्दल काहीसे विशेष वाटत असते. अशाच एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ऍना ऊर्फ अनिता (अथिया शेट्टी) हिला परदेशाचे भलतेच आकर्षण असते. ती आपल्या आई-वडिलांसह भोपाळ येथे राहात असते. तिला लग्न करायचे असते पण लंडन किंवा अमेरिकेत राहणाऱ्या तरुणाशी. त्यामुळे तिला आलेली स्थळे ती एकेक करून नाकारत असते. त्यांच्याच शेजारी राहणारे त्यागी कुटुंब.

त्या कुटुंबातील कर्तासवरता मुलगा पुष्पेंद्र (नवाजुद्दीन सिद्धीकी) हा सातेक वर्ष दुबईला राहिल्यानंतर आपल्या घरी पोहोचतो. तो घरातील मोठा मुलगा असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी असते. त्याची आई त्याचे लग्न चांगला हुंडा देणाऱ्या मुलीशी लावण्याचा विचार करत असते. त्याचे वय झाल्यामुळे तो जाड-बारीक अशा कोणत्याही मुलीशी लग्न करण्याचा विचार करीत असतो. त्याच दरम्यान ऍनीचा परदेशी मुलांचे शोध घेण्याचे प्रयत्न सुरूच असतात. या तिच्या प्रयत्नांना जेव्हा यश येत नाही तेव्हा तिची आत्या (करुणा पांडे) तिला एक सल्ला देते. तो सल्ला असतो पुष्पेंद्रवर प्रेमाचे नाटक करण्याचा. कारण तो दुबई रिटर्न असतो आणि हे हातातील स्थळ जाऊ नये, असा तिचा प्रयत्न असतो. दोन्ही कुटुंबीयांना या गोष्टीचा काहीच थांगपत्ता नसतो आणि मग कथानक अचानक एका वळणावर येऊन ठेपते. 

Image may contain: 2 people, people smiling, people standing

दोन मध्यवर्गीय कुटुंबाची ही कहाणी आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाच्या समस्या व त्यांचे छोटे छोटे प्रश्‍न दिग्दर्शक देवामित्रा बिस्वाल यांनी चांगलेच अधोरेखित केले आहेत. नवाजुद्दीन सिद्धीकी, अथिया शेट्टी, विभा छिब्बर, नवनी परिहार या सगळ्याच कलाकारांनी आपल्या दणकेबाज अभिनयाने चार चांद लावले आहेत. नवाजुद्दीन हा मोठ्या ताकदीचा अभिनेता आहे. भूमिका छोटी असो वा मोठी; प्रत्येक भूमिकेत तो भाव खाऊन जातो. या चित्रपटातील त्याची भूमिका अशीच तोलामोलाची आहे. काहीशी विनोदी ढंगाची आहे आणि त्याने ती नेहमीप्रमाणे समरसून केली आहे. ऍना ही खोडकर, बिनधास्त तरुणी आहे आणि अथिया शेट्टीने ती छान साकारली आहे. विशेष म्हणजे करुणा पांडे या अभिनेत्रीने कमाल केली आहे. तिची भूमिकाही तेवढ्याच तोलामोलाची आहे. 

चित्रपटातील सगळा थाटमाट उत्तम जुळून आला आहे. संगीतही काही प्रमाणात चांगले झाले आहे, असे म्हणता येईल. मात्र कथेचा आत्मा छोटा आहे. त्यामुळे फारशी गंमत किंवा उत्सुकता चित्रपट पाहताना येत नाही. दोन कुटुंब... त्यांच्या समस्या, पहिले एकमेकांचे शेजारी आणि नंतर त्यांच्यातील निर्माण होणारे नातेसंबंध... हा सगळा टिपीकल फॉर्म्युला वाटतो. चित्रपट करमणूक करतो खरा. परंतु म्हणावा तसा फ्रेश वाटत नाही. 

अडीच स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: motichoor chaknachoor hindi movie review