प्रेमात सर्वस्व हरवून बसलेला 'कबीर सिंग' 

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 22 जून 2019

शाहीद कपूर, कियारा अडवानी, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता, आदिल हुसेन अशा काही कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. अर्जुन रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच कबीर सिंग हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

साऊथमधील चित्रपटांचा हिंदीमध्ये रिमेक किंवा डब होणे हा प्रकार तसा नवीन राहिलेला नाही. यापूर्वी "गजनी', "सिंघम', "रावडी राठोड' अशा काही साऊथमधील चित्रपटांचा हिंदी रिमेक बनलेला आहे आणि ते चित्रपट यशस्वी ठरलेले आहेत. आता सन 2017 मध्ये तेलगू भाषेत बनलेल्या "अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा हिंदी रिमेक "कबीर सिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 

Image result for kabir singh

शाहीद कपूर, कियारा अडवानी, सुरेश ओबेरॉय, निकिता दत्ता, आदिल हुसेन अशा काही कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. अर्जुन रेड्डी चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा यांनीच कबीर सिंग हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ही एक लव्हस्टोरी आहे आणि तीही वेगळ्या धाटणीची. कारण प्रेम करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कुणी प्रेमात स्वतःला झोकून देतो... कुणी प्रेमासाठी मोठा त्याग करतो... कुणी प्रेमापोटी एखादा कठोर निर्णय घेतो; तर कुणी प्रेमामध्ये आपले सर्वस्व हरवून बसतो. अशाच प्रेमासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या आणि नंतर नशेच्या आहारी जाणाऱ्या कबीर सिंग नावाच्या तरुणाची ही कथा आहे. 

 kabir singh

कबीर सिंग (शाहीद कपूर) हा दिल्लीमध्ये आयआयएम महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असतो. तो अत्यंत हुशार. फुटबॉलमध्येही चॅम्पियन. परंतु त्याचा स्वभाव तापट, हेकेखोर आणि रागीट. त्याच कॉलेजात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रीती (कियारा अडवानी)च्या तो प्रेमात पडतो. ती सरळ, साधी मुलगी. तिला पहिल्यांदा पाहताक्षणी कबीर सिंग तिच्या प्रेमात पडतो. कबीर अक्षरशः सावलीसारखा तिच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. एके दिवशी तो तिच्या घरी जातो आणि प्रीतीवर आपले प्रेम आहे, असे तिच्या वडिलांना सांगतो. ते या प्रेमास विरोध करतात आणि प्रीतीचे लग्न दुसऱ्याच तरुणाशी लावण्याचा निर्णय घेतात. परिणामी कबीर सिंग नशेच्या आहारी जातो. सतत दारू पिणे आणि ड्रग्ज घेऊन तो सर्वस्व गमावतो. त्याचे वडीलही त्याला घरातून बाहेर काढतात. मात्र या वेळी त्याला साथ देतो तो त्याचा एकमेव मित्र शिवा (सोहम मुजुमदार). मग पुढे काय आणि कशा घडामोडी घडतात हे चित्रपटात पाहिलेले बरे. 

खरे तर कोणत्याही चित्रपटाची रिमेक करताना पटकथेमध्ये थोडाफार बदल करणे अपेक्षित असते. परंतु दिग्दर्शक संदीप वांगा यांनी फ्रेम टू फ्रेम साऊथचीच कॉपी केली आहे. त्यामुळे चित्रपट म्हणावा तसा परिणाम साधत नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन नेमके असले, तरी मांडणी काहीशी विस्कळित झाली आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी आणि कलाकारांचा अभिनय या बाबी उल्लेखनीय आहेत. "उडता पंजाब' आणि "हैदर' या चित्रपटानंतर अफलातून अभिनय शाहीद कपूरने केला आहे. कबीर सिंग त्याने झकास साकारला आहे. कियारा अडवानीच्या वाट्याला संवाद खूप कमी आले आहेत. परंतु तिने डोळ्यांतून आपल्या भावना आणि प्रेम छान व्यक्त केलं आहे.

kabir singh

सोहम मजुमदारने या भूमिकेमध्ये आपले स्वत्व ओतले आहे. अन्य कलाकारांनी आपापल्या भूमिका छान वठविल्या आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम. संगीतही चांगले. परंतु चित्रपटाची लांबी अनावश्‍यक आहे. तसेच दारू पिणे आणि सिगारेट ओढण्याचा ओव्हरडोस झाला आहे. एकूण काय तर अनावश्‍यक लांबी आणि विस्कळित झालेला चित्रपट आहे. त्यामुळे नेमका परिणाम साधण्यास चित्रपट अपुरा पडला आहे. 

अडीच स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movie review of hindi movie Kabir Singh