धोनीला 'नो'.. मग सचिनला कसा हो?

Sachin Tendulkar MS Dhoni
Sachin Tendulkar MS Dhoni

पुणे : गेल्यावर्षी एम एस धोनी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये भरारी घेतली. केवळ हिंदीच नव्हे तर तेलगू, मराठी आणि तामिळमध्ये तो प्रदर्शित होणार होता. ठरल्याप्रमाणे मराठी वगळता तो प्रदर्शित झाला. हा सिनेमा प्रदर्शित झाला तर मराठी सिनेउद्योगाला फटका बसेल असे मत मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नोंदवत मराठी व्हर्जनला विरोध केला. मग निर्मात्यानेही बेत रद्द केला त्यामुळे धोनीचा डब अवतार मराठीत आला नाही. हे आठवण्याचे कारण असे की आता उद्या 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा इंग्रजी हिंदीसह मराठीत रिलीज होतोय. धोनीला अटकाव करणाऱ्या मनसेने सचिनला ग्रीन सिग्नल दिलाय. पण मराठी निर्माते मात्र या सचिनवर नाराज झाले आहेत. 

धोनी हा सिनेमा आला त्यावेळी इतर मराठी सिनेमेही प्रदर्शित होणार होते. म्हणूनच धोनीच्या मराठी व्हर्जनला मनसेने विरोध केला होता. आता या शुक्रवारीही 4 मराठी सिनेमे येतायत. यात 'करार', 'ताटवा', 'ओली की सुकी' आणि 'खोपा' या सिनेमांचा समावेश होतो. सचिन: अ बिलीयन ड्रिम्स आल्यामुळे मराठी सिनेमांना थिएटर मिळायची म़ुश्किल झाली आहे. आधीच चार मराठीत स्पर्धा असताना सचिनही मराठीेेत आल्याने हिंदीसह मराठी प्रेक्षकही हा सिनेमा बळकावेल अशी भीती दबक्या आवाजात व्यक्त होते आहे.

ही मंडळी सध्या सचिनच्या 'अशा' आगमनामुळे नाराज आहेत. याबद्दल प्रातिनिधिक मत नोंदवताना ताटवाच्या निर्मात्या डॉ. शरयू पाझर कमालीच्या संतापल्या. त्या म्हणाल्या, 'सचिन भारतरत्न आहे याची आम्हाला कल्पना आहे. पण त्याने मराठीतल्या आमच्यासारख्या निर्मात्यांचा विचार केला नाही. या सिनेमाने सगळी थिएटर्स ब्लॉक केली आहेत. कोणत्याही चॅनलवरच्या शोला आम्हाला जाता येत नाही. सगळीकडे तोच आहे. आम्ही आमचा सिनेमा कसा पोचवावा? खरेतर त्याला प्रमोशनची गरज नव्हती. त्याने त्याच्या सिनेमात स्वतःचीच प्रसिद्धी केली आहे. खरा सामाजिक सिनेमा आमचा आहे. मराठी जपली जावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण सचिनने आमचा भ्रमनिरास केला.' 

इतर निर्मत्यानीही नाव न सांगण्याच्या अटीवर नाराजी नोंदवली. 'धोनीबद्दल कडक पावले उचलणाऱ्या मनसेला सचिनचा पुळका का? व्यवसायावर परिणाम होतो आहेच. सचिनबद्दल असलेल्या संबंधामुळेच हे झाले आहे, असे तो म्हणाला. 

याबद्दल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ' धोनी हा सिनेमा डब करण्यात आला होता म्हणून त्याला आमचा विरोध होता. सचिनचा सिनेमा हा रिशूट करण्यात आला आहे. त्यामुळे अशा सिनेमावर आमचा आक्षेप नाही. डब सिनेमे प्रदर्शित करण्यावर आमचा आक्षेप यापुढेही असेल. '

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com