
Nagraj Manjule: छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा कधी बनवणार? नागराज मंजुळेंनी स्वतःच केला हा खुलासा
Nagraj Manjule News: घर बंदूक बिरयानी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसत आहेत.
नागराज सोबत या सिनेमात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे महाराष्ट्रात सगळीकडे फिरत आहेत.
(Nagraj Manjule open up about his upcoming film based on life of Chhatrapati Shivaji Maharaj )
नागराज मंजुळे यांनी काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवण्याची घोषणा केली होती. रितेश देशमुख या सिनेमाची निर्मिती करणार होते.
याशिवाय रितेश देशमुख या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार अशी चर्चा होती. घर बंदूक बिरयानी सिनेमानिमित्ताने नागराज मंजुळे यांनी मीडियाशी संवाद साधला.
पत्रकारांशी संवाद साधताना नागराज मंजुळे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा कधी पाहायला मिळणार असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नागराज मंजुळे यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
नागराज म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मी जो चित्रपट तयार करतोय तो एकदम चांगलाच व्हावा अशी माझी इच्छा आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट बनवणे हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
या चित्रपटाचं जेव्हा शूटिंग करून पूर्ण होईल आपण काहीतरी खूप छान केलंय अशी भावना मला हवी आहे. त्यामुळे मला हा चित्रपट कसल्याही घाईत करायचा नाहीये.
उगाच बनवायचं म्हणून काहीतरी सिनेमा करायचा आणि नंतर तो मी केला असं म्हणायचा हा विचार माझ्या तत्वात बसत नाही. मला माझं १००% देऊन हा सिनेमा बनवायचा आहे ”
नागराज यांनी चित्रपट विश्वात स्वतःचे नावच केले नाही तर एक इतिहास घडवला आहे. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून नागराज इथवर पोहोचले आहेत.
नागराजच्या 'घर बंदूक बिरयानी' मधून ते नव्या विषयाला वाचा फोडणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.
आता कधी एकदा हा चित्रपट पाहतोय याची उत्कंठा चाहत्यांना लागली आहे. येत्या 7 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.