कॉमेडियन भारती अन्‌ हर्षचा नाशिकमध्ये रंगला रोमान्स

अरुण मलाणी
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

'रायटर बाजी मार गया...' 
टीव्ही स्क्रीनवर सलमान व शाहरूख खानसह रणबीर कपूर अन्‌ अन्य अभिनेत्यांसोबत फ्लर्ट करणारी भारती म्हणाली, की 'जिंदगी में हीरो तो बहोत मिलें, लेकिन दिल जितने में रायटर बाजी मार गया.' नऊ वर्षे रात्रंदिवस काम केले असून, आता लग्नासाठी तीन महिने सुटी घेतली आहे. या काळात पुरेपूर आनंद लुटायचाय, असे भारती म्हणाली. लग्नाच्या शॉपिंगचा सध्या धडाका सुरू असून, हर्षसाठीही आपणच शॉपिंग करत असल्याचे तिने सांगितले. 

नाशिक : टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना मनसोक्‍त हसविणारी कॉमेडियन भारती सिंग अन्‌ लेखक हर्ष लिंबाचिया 3 डिसेंबरला गोव्यात विवाहबद्ध होतायत. यानिमित्त प्री-वेडिंग फोटोशूटसाठी ते नाशिकला आले असून, या दौऱ्यावर जगप्रसिद्ध वाइनमुळे त्यांच्यात रोमान्स चांगलाच रंगलाय. सुला विनियार्डसमधील द सोर्स रिसॉर्टमध्ये त्यांनी मनमुराद आनंद लुटला.

दरम्यान, सर्वांना लग्नाला आमंत्रित करणे शक्‍य नसल्याने लग्नसोहळ्याला वेब सिरीजद्वारे सर्वांपर्यंत पोचविणार असल्याचे भारती अन्‌ हर्षने सांगितले. वेब सिरीजच्या एका भागाचे शूटिंगही सुलामध्ये केले. कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर यांच्यासोबत एकत्रित काम करण्याची इच्छा भारतीने यानिमित्त 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली. या कपलचा लग्न सोहळा गोव्यात होत असून हनीमुनसाठी युरोपला जाणार आहेत. कॉमेडियन भारती सिंग म्हणाली, की नाशिकमध्ये येण्यापूर्वी फारशी कल्पना नव्हती. पण येथे आल्यानंतर सुलामधील सुविधा अनुभवताना नेहमी येथे येण्याचे ठरविले आहे. विशेषत: सुला फेस्टला आम्ही आवर्जून येऊ. इथली वाइन चाखताना मोह आवरता आला नाही अन्‌ द सोर्स रिसॉर्टच्याही आम्ही प्रेमात पडलो असून, आमच्या वेब सिरीजचा हा रिसॉर्ट सोर्स बनलाय, असे ती म्हणाली. 

हर्ष गाडीच्या मागे भारती सिंगला बांधून फिरवतो? surprise

लग्नसोहळ्याविषयी उत्साही असलेली भारती म्हणाली, की हर्ष मला भेटल्याने मी स्वत:ला भाग्यशाली समजते. लग्नाचा खर्च मुलीच्या कुटुंबानेच करायचा असतो, ही प्रथा मोडून काढत दोघांच्या योगदानातून आमचे लग्न होतेय. तरुणाईने लग्न कमी खर्चात करावे, पण दोघांच्या योगदानातून करावे, असा संदेश आम्ही देऊ इच्छितो. 
हर्ष लिंबाचिया म्हणाला, की बहुतांश वेळ लेखनासाठी मी गोव्यामध्ये राहत असल्याने वेडिंग डेस्टिनेशन म्हणून या ठिकाणाची निवड केली. करिअरविषयी तो म्हणाला, की लहानपणी शाळेत असताना लिहिलेल्या कवितेबाबत सरांनाही विश्‍वास बसला नाही. पण त्यातून प्रेरित होऊन आपण लेखक झालो. 

कॉमेडियन हा 'फिलर' राहिलेला नाही 
काही वर्षांपूर्वीपर्यंत कॉमेडियनला फिलर म्हणून समजले जात होते व अधूनमधून थोडीफार भूमिका दिली जायची. पण आज प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना विनोद हवाच असतो. कॉमेडियन कधीही अयशस्वी होत नाहीत, दीर्घ काळापर्यंत लोक त्यांना पसंत करतात. कॉमेडियन आता फिलर राहिलेले नाहीत, असे भारती म्हणाली. 

वेब सिरीजमध्ये मनमोकळं काम करण्याच स्वातंत्र्य : हर्ष 
भारतीसोबत लग्न करण्याचे आणि स्वत:चे प्रोडक्‍शन हाऊस असावे असे माझे दोन स्वप्न होते. हे दोन्ही स्वप्न पूर्ण होत असल्याचा मनस्वी आनंद होतोय. एच3 या माझ्या प्रोडक्‍शन हाऊसद्वारे आम्ही वेगवेगळ्या वेब सिरीजवर काम करतो आहोत. भारतीचा कॉमेडियन होण्यापर्यंतचा प्रवास आम्ही मांडणार आहोत. याशिवाय आयपीएलवर आधारीत एक प्रोजेक्‍ट हाती घेतलाय. भारती मुख्य भुमिकेत असलेला चित्रपटदेखील आम्ही साकारतो आहोत. स्वत:च प्रोडक्‍शन हाऊस असल्यानं काम करण्याचं स्वातंत्र मिळणार असल्याबद्दल हर्ष लिंबाचियाने आनंद व्यक्‍त केला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: nashik marathi news comedian bharti singh harsh romance