नाटक प्रेक्षकांच्या घरी;...ही आहे अभिनेता श्रेयस तळपदे याची भन्नाट कल्पना 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 मे 2020

सध्याची परिस्थिती पाहता नाट्यगृह लवकर सुरू होतील याची शक्‍यता फार कमी आहे. जर सुरू झाली तर कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात कितपत येईल, याबाबतही खात्री देता नाही. साधारण दिवाळीपर्यंत तरी नाट्यगृह सुरू होण्याची शक्‍यता कमी असल्याने अभिनेता श्रेयस तळपदेला यावर तोडगा शोधायला हवा असे वाटले.

मुंबई ः लॉकडाऊनमुळे दोन महिने थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे नाट्यसृष्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. कोरोनामुळे नाट्यगृह कधी सुरू होतील याबद्दल अजून चित्र  स्पष्ट होत नाही. त्यामुळे नाटक प्रेक्षकांच्या घरी भेटीला आले तर... अभिनेता श्रेयस तळपदेने लॉकडाऊनमध्ये नाट्यसृष्टीला उभारी देण्यासाठी "थिएटर तुमच्या दारी' या अनोख्या संकल्पनेतून ऑनलाईन व्यासपीठावर नाटकाचे प्रयोग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत श्रेयसचे कामही सुरू झाले आहे. नाट्यक्षेत्रातील काही निर्मात्यांनी या नव्या प्रयोगासाठी तयारी दर्शवली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या दारी नाटक येणार आहे. 

हेही वाचा ः प्रेक्षकांच्या 'या' तीन आवडत्या मराठी मालिका आता पाहता येणार ZEE5 वर

सध्याची परिस्थिती पाहता नाट्यगृह लवकर सुरू होतील याची शक्‍यता फार कमी आहे. जर सुरू झाली तर कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात कितपत येईल, याबाबतही खात्री देता नाही. साधारण दिवाळीपर्यंत तरी नाट्यगृह सुरू होण्याची शक्‍यता कमी असल्याने अभिनेता श्रेयस तळपदेला यावर तोडगा शोधायला हवा असे वाटले. या क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकचीच काही कलाकारांची ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये ऑनलाईन व्यासपीठावर नाटकाचे प्रयोग दाखवणे ही संकल्पना श्रेयसने मांडली. त्याची ही संकल्पना या क्षेत्रातील काही लोकांना आवडली. त्यानंतर संकल्पना प्रत्यक्ष आणण्यासाठी कामास सुरूवात झाली.

महत्त्वाची बातमी ः 'लिव्ह इन'मध्ये राहायचे प्रेमीयुगुल; संबंधात अडथळा आल्याने युवक चवताळला अन्‌...

 

ऑनलाईन थिएटर या संकल्पनेमध्ये आता जी रंगमंचावर नाटके सादर केली जातात. तीच नाटके ऑनलाईन व्यासपीठावर आणायची. त्यासाठी - लोकांच्या समूहात नाटकाचे चित्रिकरण एखाद्या नाट्यगृहात सरकारची परवानगी घेऊन व कोरोनाबाबत सर्व नियमांचे पालन करून करायचे. चित्रिकरण केलेल्या नाटकाचा प्रयोग नाट्यगृहाच्या प्रयोगानुसार दुपारी 4 वाजता, रात्री 8 वाजता असा ऑनलाईन व्यासपीठावर लावायचे. त्यांची ऑनलाईन तिकीट विक्री असणार आहे. ऑनलाईन व्यासपीठावर दोन-अडीच तासाचे नाटक अपलोड होईल. त्यानंतर त्या व्यासपीठावरून ते नाटक ऑटोडिलीट होईल. केवळ त्याच वेळेत प्रेक्षकांना नाटक पाहायला मिळेल. ते नाटक प्रेक्षकांना डाऊनलोड करता येणार नाही तसेच रेकॉर्डही करता येणार नाही. अशी श्रेयसने ऑनलाईन थिएटरची संकल्पना सांगितली. 
        समाजमाध्यमावर ऑनलाईनचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ झूम, यूट्यूब लाईव्ह. त्यातील सुरक्षित माध्यम या प्रयोगासाठी निवडले जाईल. तिकीट दर, चित्रिकरणाची परवानगी यावर काम सुरू आहे. तसेच नाट्य निर्मात्यांशी बोलणे सुरू आहे. यासाठी काही निर्मात्यांनी या व्यासपीठाचा अवलंब करण्याची तयारी दाखवली आहे, असेही श्रेयस म्हणाला. 
    या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्याला थिएटरवर जे शो होतात तेवढे पैसे मिळणार नाही किंवा त्याहूनही अधिक मिळू शकतील. त्यासाठी ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे गरजेचे आहे. सध्या बंद असलेल्या नाट्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच कलाकार आणि रंगमंच कामगार यांना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात थोडे फार आर्थिक स्थैर्य देण्यासाठी ही संकल्पना राबविणे आवश्‍यक आहे. ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला आहे. दिग्दर्शक विजय केंकरे, सुमीत राघवन, संजय नार्वेकर ही मंडळीदेखील या प्रकारच्या प्रयोगासाठी तयार आहेत. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आम्ही ऑनलाईन नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून येत आहोत, असे श्रेयसने सांगितले. 

 Natakache Prayog at online Shreyas Talpade idea


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natakache Prayog at online Shreyas Talpade idea