Natya parishad Election: नाट्य परिषदेची निवडणूक की राजकीय आखाडा? खरा सामना एकनाथ शिंदे vs शरद पवार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Natya parishad Election, prashant damle, eknath shinde, sharad pawar, prasad kambli, uday samant

Natya parishad Election: नाट्य परिषदेची निवडणूक की राजकीय आखाडा? खरा सामना एकनाथ शिंदे vs शरद पवार...

Natya parishad Election News: सध्या मराठी नाट्य वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार असून अत्यंत अटीतटीचा असा हा सामना रंगणार आहे.

(Natya Parishad election or political election? Real fight between Eknath Shinde vs Sharad Pawar)

यंदाच्या निवडणुकीसाठी दोन पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. यामध्ये ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि 'आपलं पॅनल' असे दोन पॅनल आमने- सामने आहेत.

अभिनेते प्रशांत दामले ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलचे प्रतिनिधित्व करत आहेत तर 'आपलं पॅनल' हे निर्माते प्रसाद कांबळी यांच्या प्रतिनिधित्वात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

या दोन्ही गटांमध्ये आता प्रचंड मोठा चुरशीचा सामना आहे. पण आता या निवडणुकीला राजकीय रंग चढला असून एकनाथ शिंदे आणि शरद पवार असा राजकीय आखाडा यंदाच्या निवडणुकीत रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

प्रशांत दामले ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलसाठी उदय सामंत यांचा तगडा पाठिंबा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार उदय सामंत यांच्या घरी प्रशांत दामलेंच्या ‘रंगकर्मी नाटक समूहाची बैठक झाली. या बैठकीत नाट्य परिषदेच्या निवडणुकीची रणनीती आखण्यात आली.

उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचे नेते असल्याने यंदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा पगडा असल्याचं बोललं जातंय.

तर दुसरीकडे शरद पवार हे नाट्यपरिषेदेचे तहययात सदस्य आहेत. कोविड काळात प्रसाद कांबळेंनी जो निर्णय घेतला त्याला नियामक मंडळाने विरोध केला.

परंतु शरद पवार यांनी मात्र प्रसाद कांबळी यांनाच पाठींबा दिला, अशी चर्चा आहे. त्यामुळे वरवर पाहता पवारांचा 'आपलं पॅनल'ला पाठिंबा आहे, असेही बोललं जात आहे.

त्यामुळे हि निवडणूक प्रशांत दामले विरुद्ध प्रसाद कांबळी यांच्या पॅनलची असली तरीही पडद्याआड मात्र हि निवडणूक शरद पवार विरुद्ध एकनाथ शिंदे अशी रंगताना दिसणार आहे.

यंदा प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला आव्हान द्यायला अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले निवडणुकीत उतरले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची त्यांच्या 'रंगकर्मी नाटक समूह’ या पॅनलची कार्य आणि उद्दिष्टे जाहीर केली.

त्यांच्या पॅनल मध्ये विजय केंकरे, अजित भुरे , सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, दिलीप जाधव, सुशांत शेलार, सविता मालपेकर, विजय सूर्यवंशी या नावांचा समावेश आहे.