
Prashant Damle: नाट्यगृहाच्या दुरावस्थेने कलाकार हैराण! नाट्य परिषद अध्यक्ष प्रशांत दामलेंकडून मात्र सरकारची पाठराखण
Prashant Damle On theatres : अभिजात नाटकांचा वारसा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात तेच नाटक सादर करताना अनेक अडथळे येत आहेत. कारण गेल्या काही महाराष्ट्रात नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुठे एसीमध्ये बिघाड आहे तर कुठे अस्वच्छता आहे. मेकअप रूम नीट नाहीतर कुठे साधारण गरजाही पूर्ण होऊ शकत नाही अशी अवस्था नाट्यगृहांची आहे. या दुरवस्थेवर सध्या बरेच कलाकार संताप व्यक्त करत आहेत.
नुकतेच अभिनेता भरत जाधव यांनी रत्नागिरीतील नाट्यगृहाची स्थिती वाईट असल्याने तिथे पुन्हा प्रयोग करणार नाही असा संतापजनक व्हिडिओ शेयर केला तर वैभव मांगले, अभिनेत्री विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, आस्ताद काळे अशा अनेक कलाकारांनी वारंवार या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पण नुकतेच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेले प्रशांत दामले यांनी मात्र दुरवस्थेकडे काहीसे दुर्लक्ष करून शासनाची पाठराखण केली आहे.
(natya parishad president prashant damle reaction on bad condition of theatres in maharashtra)
नुकताच प्रशांत दामले यांनी 'साम टिव्ही' सोबत संवाद साधला यावेळी त्यांना राज्यातील नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत विचारले गेले. तेव्हा दामले म्हणाले, ''नाट्यगृहांची दुरवस्था आहे, त्याबाबत दुमत नाही. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून मी शासनासोबत पाठपुरावा करत आहे. सांस्कृतिक विभाग या संदर्भात खूप काम करत आहे.''
'' नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांच्याकडून मला पॉझिटिव्ह रिप्लाय आला आहे, येत्या २ ते ३ महिन्यात प्रत्यक्ष कार्यवाही होईल.''
पुढे त्यांना यासाठी किती वेळ जाईल असे विचारण्यात आले. त्यावर प्रशांत दामले म्हणाले, ''प्रशासकिय काम असल्याने किती विलंब होईल, याची मला खरच खात्री नाही. हे माझ्यासाठी सर्व नवीन आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उदय सामंत हे चौघेही यात लक्ष घालत आहेत. शिवाय सांस्कृतिक सचिवही नाट्यप्रेमी आहेत.
त्यामुळे केवळ मंत्रीच नाही तर प्रशासकीय अधिकारीही यात लक्ष देत असल्याने लवकरात लवकर हे काम मार्गी लागेल अशी मला आशा आहे,'' असे मत नाट्यगृह दुरवस्थेबाबत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.