सत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत

काजल डांगे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

मंटो चित्रपट हा पूर्णपणे वेगळा आहे. बऱ्याच काही नव्या गोष्टी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहता येतील. ज्यांनी 'सेक्रेड गेम्स' पाहिलं आहे, त्यांच्या मनात नक्कीच मंटोबाबत उस्तुकता असणार. याचा माझ्या चित्रपटाला फायदाच होणार आहे. कारण एकदा प्रेक्षकांना तुमच्या भूमिका, तुमचं काम आवडू लागलं की तुम्ही पुढे अजून काय काय नव्या भूमिका साकारता याकडे त्यांच लक्ष लागलेलं असतं. - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी

'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या याच चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत... 

1) 'मंटो'मधील तुझ्या भूमिकेबाबत काय सांगशील? 

  • या चित्रपटातील माझी भूमिका सत्याच्या बाजूने लढणारी आहे. त्यामुळे मला माझ्या अभिनयात खरेपणा आणायचा होता. कारण एक सामाजिक विषय जेव्हा तुम्ही रुपेरी पडद्यावर मांडता, तेव्हा तुमच्या भूमिकेतही तितकाच खरेपणा हवा. अशाप्रकारच्या कठोर भूमिका साकारताना तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव, भूमिकेतला खरेपणा महत्त्वाचा असतो. मला कॅमेऱ्यासमोर असं भासवून द्यायचं होतं की मी जे बोलतोय ते माझेच विचार आहेत. भूमिकेत खरेपणा कसा आणता येईल यावर आम्ही जास्त काम केलं. 

2) या चित्रपटासाठी तू मंटोची पुस्तकही वाचली असशीलच... 

  • मंटोबाबत मी ऐकलं होतं. त्यांची पुस्तकं फारशी वाचली नाहीत; पण त्यांच्या काही गोष्टी, त्यांनी न्यायव्यवस्थेविरोधात दिलेला लढा याबाबत मी वाचलं आहे. थिएटरचे जे कलाकार आहेत, त्यांच्यामध्ये मंटो हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. आम्ही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये असताना मला 'मंटो' चित्रपटाबाबत कळलं. मला तिथे नंदिता भेटली. तेव्हा तिने मला सांगितलं, 'मी मंटोवर रिसर्च करत आहे. रिसर्च जर यशस्वी ठरला, तर यावर आधारित मी चित्रपट बनवणार आहे.' तेव्हा मी म्हणालो होतो, 'तू हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेशील तेव्हा मला सांग. मी चित्रपट करण्यास तयार आहे.' 

3) तुझ्या 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजलाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या वेबसीरिजला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल काय सांगशील? 

  • खरं तर ही वेबसीरिज इतकी गाजेल असं मला अजिबात वाटलं नाही. मी काय, माझ्या संपूर्ण टीमसाठी ही आश्‍चर्यकारक गोष्ट होती. 'सेक्रेड गेम्स'चे जेव्हा एपिसोड प्रदर्शित झाले, तेव्हा मी रोममध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. तेव्हा तिथल्या माझ्या चाहत्यांनी मला भेटून 'सेक्रेड गेम्स'बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या त्या प्रतिक्रिया ऐकूनच आपलं काम भारताबाहेरही लोकांना आवडत आहे, याचं कुठेतरी मनाला समाधान वाटलं. 

4) 'सेक्रेड गेम्स'ची सगळीकडे चर्चा सुरू असताना तुझ्या 'मंटो' चित्रपटाला कितपत फायदा होईल, असं तुला वाटतं? 

  • मंटो चित्रपट हा पूर्णपणे वेगळा आहे. बऱ्याच काही नव्या गोष्टी या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहता येतील. ज्यांनी 'सेक्रेड गेम्स' पाहिलं आहे, त्यांच्या मनात नक्कीच मंटोबाबत उस्तुकता असणार. याचा माझ्या चित्रपटाला फायदाच होणार आहे. कारण एकदा प्रेक्षकांना तुमच्या भूमिका, तुमचं काम आवडू लागलं की तुम्ही पुढे अजून काय काय नव्या भूमिका साकारता याकडे त्यांच लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे 'मंटो'मधून एक नवा नवाजुद्दीन प्रेक्षकांच्या समोर येईल. 
     

manto movie

5) या चित्रपटात तू सत्याच्या बाजूने लढा देत आहेस. तर आजही आपल्या देशात सत्य परिस्थितीला पाठीशी घातलं जातं आहे, असं तुला वाटतं का? 

  • खरं सांगायचं झालं तर आपला समाजच सत्याच्या बाजूने लढायला घाबरतो. एखादं सत्य बाहेर येऊ नये यासाठी हजारो खोटी काम आपल्या न्यायव्यवस्थेत होत असतात. ते फार चुकीचं आहे. मी अगदी खुलेपणाने माझं मत मांडतो. जेव्हा कधी सत्य परिस्थिती बाहेर येते त्याचा जास्त त्रास सामान्य नागरिक आणि समाजाला होतो. मी तर म्हणेन सत्याच्या बाजूने लढा द्या आणि ताठ मानेने जगा. 

6) तू 'मंटो' नंतर 'ठाकरे' या चरित्रपटासाठीही काम करत आहेस. त्यात काम करणं तुझ्यासाठी कितपत आव्हानात्मक होतं? 

  • मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो चरित्रपट म्हणजे मिमिक्री नव्हे. चरित्रपट करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. एखाद्या प्रतिष्ठीत, नावाजलेल्या व्यक्तीचं काम तुम्ही जगासमोर आणता, तेव्हा तुमच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी असते. सिक्‍स पॅक अॅब्स बनवून चरित्रपट करण्यात काहीच अर्थ नाही, असं मी म्हणेन. सिक्‍स पॅक अॅब्सने एखाद्याचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर मांडता येत नाही; पण चरित्रपटांमध्ये काम करणं एखाद्या कलाकारासाठी आव्हानात्मक असतं एवढं नक्की. कारण 'ठाकरे' करतानाच माझ्यावर फार मोठं दडपण होतं. कारण बाळासाहेब ठाकरे यांची भाषण करण्याची पद्धत, त्यांचे हावभाव समजून घेताना मला थोडा वेळ लागला. 

7) नवाजुद्दीन यापुढे कोणत्या रोमॅण्टिक चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार का? 

  • हो नक्कीच. या सगळ्या चरित्रपटांचे काम झाल्यावर माझ्याकडे चार प्रेमकथेवर आधारित चित्रपट आहेत. त्यामध्ये अगदी नवाजची एक वेगळीच बाजू दिसेल. एका चित्रपटामध्ये मी अथिया शेट्टीबरोबर काम करताना दिसेन. दुसरीकडे सानिया मल्होत्राबरोबर माझा एक चित्रपट आहे. 'रात अकेली है' हादेखील माझा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि प्रत्येक प्रकारचे चित्रपट करताना मी फार एन्जॉय करतो. 

manto movie

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawazuddin Siddiqui Interview For Manto Movie