कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकणार नवाजुद्दीन

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल, नवाजुद्दीन सिद्दीकी यांना कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे.

सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडे असो वा गँग्स ऑफ वासेपुरच्या दोन्ही भागातील फैजल खान, अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीने आपल्या अभिनयाने जागतिक स्तरावर करोडो लोकांच्या मनावर राज्य केलेले आहे. म्हणूनच भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल, नवाजुद्दीन सिद्दीकी यांना कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सीआयएफएफ) चे संस्थापक राहिल अब्बास यांनी नवाजुद्दीन सिद्दीकी यांना प्रतिष्ठित गोल्डन ड्रॅगन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे जाहीर करत पुढे सांगितले की, “नवाज आमचे खास पाहुणे आहेत.” आंतरराष्ट्रीय सीआयएफएफशी संबंधित उपक्रमांचे आंतरराष्ट्रीय संचालक सुहेल सय्यद यांनीही राहिल यांनी केलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सन्मानाच्या घोषणेची पुष्टी केली. ते म्हणाले, “राहिलच्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना ही बातमी कळविताना मला खूप आनंद झाला, नवाज यांनी या महोत्सवासाठी उपस्थित राहण्याची देखील हमी दिलेली आहे."

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील उपस्थितीच्या प्रतिक्षेत असलेले नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतात की, "ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भाग घेण्यास मी खूप उत्सुक आहे. यावर्षी महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या सर्व चित्रपटांचे मी अभिनंदन करू इच्छितो.”

नवाजुद्दीन सिद्दीकीशिवाय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया, बेथन सैय्यद - असेंम्बली मेम्बर अँड चेअरमनऑफ कल्चर अँड मीडिया (वेल्स), नोमेन जे, फ्लॉरेन्स एईसी - ऑस्कर नामित डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर, वॉरेन - दिग्गज ब्रिटिश दिग्दर्शक, कीथ विलियम्स - वीडियो कॉन्सेप्चुअल आर्टिस्ट आणि जो फ़ेरेरा - ब्रिटिश अभिनेता यांसारखी विख्यात व्यक्तिमत्त्वे २०१९ च्या कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास ज्यूरी म्हणून लाभणार आहेत.

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सीआयएफएफ) चे संस्थापक राहिल अब्बास म्हणतात की,“एक राष्ट्र म्हणून वेल्स, कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उपस्थित असलेल्या सर्व चित्रपट निर्मात्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि चित्रपट निर्मात्यांना वेल्स येथील सौंदर्य आणि प्रतिभा पाहण्यासाठी आमंत्रित करीत आहे."

कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २४ ऑक्टोबर २०१९ ते २७ ऑक्टोबर २०१९ या काळात कार्डिफ बे, या वेल्सच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक पियरहेड इमारतीत आयोजित केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawazuddin siddiqui will be in Cardiff international film festival