नातीगोती : मानसिक आरोग्यासाठी हवा कौटुंबिक सहवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Neha Joshi

मला असे मनोमन वाटते की, कुटुंबव्यवस्था संवादावर अवलंबून असते. संवादाने अगदी आपण खूप मोठी समस्या पण सोडवू शकतो. कुटुंब म्हटले की, सुख आणि दुःख आपण एकत्र अनुभवतो.

नातीगोती : मानसिक आरोग्यासाठी हवा कौटुंबिक सहवास

- अभिनेत्री नेहा जोशी

मला असे मनोमन वाटते की, कुटुंबव्यवस्था संवादावर अवलंबून असते. संवादाने अगदी आपण खूप मोठी समस्या पण सोडवू शकतो. कुटुंब म्हटले की, सुख आणि दुःख आपण एकत्र अनुभवतो. घरातली माणसं त्यांचा वेगवेगळा स्वभाव, रुसवे फुगवे व नाती टिकून ठेवण्यासाठी

संघर्ष हा येताच, पण संवाद हा खूप महत्वाचा आहे. आपले विचार मांडणे व समोरच्याचे मत जाणून घेणे, हे खूप महत्वाचे असते; कारण त्यामुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीबद्दल खूप जाणून घेता येते.

आईसोबत माझं खूप वेगळं नातं आहे. ती माझ्या आयुष्यात फक्त आई म्हणून नाही तर मैत्रीण व मोठी बहीण असे सगळे रोल प्ले करते आणि ती खूप मस्त आहे. खूप दृढ नातं आहे आमच्या मध्ये. तिचा सर्वांत छान गुण म्हणजे सर्वांना सोबत ठेवून नाती जपते, हे सगळं करताना तिला केव्हा केव्हा त्रासही होतो; पण कुटुंब नेहमी एकत्र राहावे, असे तिचे कायम प्रयत्न असतात. वाईट व चांगल्या क्षणी ती मदतीला सगळ्यांसाठी पुढे असते. मला तिचा खूप अभिमान आहे.

सर्वांत आवडता प्रसंग मी सांगू इच्छिते, जेव्हा ती 56 वर्षांची होती, तेंव्हा तिने कथकचे प्रशिक्षण घ्याला सुरवात केली, खूप आधीपासून तिची ही इच्छा होती. तिने बऱ्याच नाटकांत व चित्रपटात काम केली आहे. आणि लग्न झाल्यानंतर घर, कुटुंब आणि आम्हा मुलांना तिने खूप छान सांभाळले. हे सगळं करण्यात तिची जी इच्छा होती, ती पूर्ण झाली नाही. पण जेव्हा तिला वाटलं की, आता माझी मुलं सेटल झाली आहेत आणि माझ्याकडे वेळ आहे, तर तिने कथकचे पूर्ण प्रशिक्षण घेतले. एकदा तिचा नाशिकमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने डान्स परफॉर्मन्स होता आणि मी तिला सरप्राइज देणार होते; पण तिनेच मला तिच्या ऐवढ्या सुंदर परफॉर्मन्सने सरप्राईझ दिले.

आमच्या कुटुंबाच एक वैशिष्ठ्य हे आहे की, आम्ही एक-दुस-यांना खूप समजून घेतो. आधीपासूनच मी आणि माझे आई-वडील व भाऊ एकमेकांना खूप सपोर्ट करतो. आजपर्यंत मी आणि माझ्या भावाने करिअरबाबत जेवढे निर्णय घेतले, त्या सगळ्यांना आई-वडिलांनी खूप सपोर्ट केला. खूप असं समजुतदार कुटुंब आहे आमचं.

आम्ही सर्व कुटुंबीय एकमेकांच्या खूप जवळ आहोत आणि आम्ही नेहमी वेगवेगळ्या प्रसंगाने एकत्र येत असतो. आमचा वाडा आहे नाशिकमध्ये, तर सगळे नातेवाईक आणि आम्ही भावंडं सण उत्सवाच्या निमित्ताने भेटतो आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणात, उत्साहात आमचा सगळा वेळ जातो. माझ्या कामाच्या व्यापामुळे मला खूप कमी सहवास मिळतो; पण जेव्हा मला घरी जाण्याची संधी भेटते, तेव्हा मी घरी जायला खूप उत्सुक असते.

सध्या मी 'एण्ड टीव्ही' वर

"दुसरी माँ" या मालिकेत यशोदाची भूमिका साकारत आहे. या मालिकेचे चित्रीकरण जयपूरमध्ये सुरू आहे. त्यामुळे मला घरा .ची खूप आठवण येते. काळजी घेणारे आपले आई-वडील जेव्हा जवळ नसतात, तेव्हा कुटुंबाचे महत्व लक्षात येते. मला आवर्जून सांगावस वाटतं की, एका चांगल्या कौटुंबिक सहवासामुळे आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राहते व आपल्या आयुष्यात स्थिरता असते. आपले कुटुंब आपल्यासाठी आहे ही कल्पनाच खूप आनंददायी असते.

कुटुंबामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे आहे. एकमेकांचे विचार ऐकून घेणे. काही समस्या असेल तर त्यातून मार्ग काढणे या सगळ्या गोष्टींमुळे नाती घट्ट होतात.

नाती दृढ होण्यासाठी....

1) नाती चांगली राहण्यासाठी, तिच्यात बळकटी येण्यासाठी सुसंवाद खूप महत्वाचा आहे.

2) एकमेकांची मदत करणे, मग प्रसंग कितीही चांगला किंवा वाईट असो.

3) आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा. कारण, त्यामुळे एकमेकांत प्रेम आणि ओढ वाढते.

4) सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांचा आदर करणे.

5) समोरच्या व्यक्तीला सदैव प्रेरणा देणे व त्या व्यक्तीचे कौतुक करणे खूप महत्त्वाचे असते.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)