पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर

New drama var khali don paay
New drama var khali don paay

मुंबई : नाटकाच्या मुख्य कथानकातली पात्र जेव्हा प्रसंगाआड असतात,तेव्हा काय घडत असेल हा नव्या शक्यतांना जन्म देणारा भाग  असतो. आपल्याकडे नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे,पण ‘त्या दरम्यान’ काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा प्रयत्न घडावा आणि नवे काही हाती लागावे म्हणून ‘अस्तित्व’ने  ‘त्या दरम्यान’ हा उपक्रम हाती घेतला त्यातून युवा नाट्यलेखक हृषीकेश कोळी याने जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष’ नाटकावर आधारित त्या दरम्यान ‘वर खाली दोन पाय’ या नाटकाच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे.या नाटकाचा पुण्यातला शुभारंभाचा प्रयोग येत्या शनिवारी १७ जूनला पुण्याच्या भरत नाट्य रंगमंदिर इथे रात्री ९ वाजता होणार आहे.

या नाटकात त्या दरम्यान घडणारी गोष्ट म्हणजे अजरामर पात्रांची मानसिकता शोधायला निघालेल्या आजच्या नटांना ८६ सालातलं पात्र वेगळ्या भुमिकेत शिरलेली भासू लागतात आणि लेखकाने लिहलेलं खरं नाटक करण्यास नकार देऊन, नटांच्या कल्पनाशक्तीसमोर आव्हान निर्माण करतात आणि तिथे सुरु होतो नट विरुध्द पात्र असा अनाकलनिय संघर्ष.

या नाटकाचा आशय,विषय आणि अभिव्यक्ती यामुळे हे नाटक त्याच्या काही महिन्यांपूर्वी  झालेल्या अभिवाचनापासून चर्चेत होते,पण ते रंगभूमीवर आणण्याचे धाडस ‘रंगालय’ या वैशाली भोसले आणि सुगंधा कांबळे यांच्या युवा रंगकर्मींच्या संस्थेने ‘अस्तिव’च्या सहयोगाने  केले. चौकटी भेदून नव्या नाट्यशक्यता आजमवण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली असून लेखन,दिग्दर्शन,अभिनय,नेपथ्य,प्रकाश,संगीत यात वेगळा प्रयोग करणारे हे नाटक म्हणूनच रंगभूमीवर आणण्याचे संस्थेने ठरवल.

मराठी रंगभूमी,मालिका क्षेत्रातली अभिनयसंपन्न म्हणून नावारूपाला आलेले युवा कलाकार वेळ काढून  या प्रयोगात आवर्जून सहभागी झाले आहेत. सुशील ईनामदार, नंदीता पाटकर. रोहन गुजर, संग्राम समेळ, पल्लवी पाटील, मयुरा जोशी, अमेय बोरकर, अजित सावंत या प्रथितयश कलावंतांसोबत स्मृती पाटकर आणि चंद्रकांत मेहेंदळे यांच्या या नाटकात मुख्य भूमिकेत आहेत.गेले सव्वा दोन महिने या नाटकाची कसून तालीम सुरु आहे.  ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांचे या प्रयोगाला सृजन मार्गदर्शन लाभले आहे.

विशेष म्हणजे या नाटकाचा मानाच्या समजल्या जाणाऱ्या पृथ्वी थिएटरमधला पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाला.  सुयोग भोसले,सचिन गोताड यांचे नेपथ्य, सायली सोमण यांची वेशभूषा,भूषण देसाई यांची प्रकाशयोजना आणि पुष्कर कुलकर्णी याचे संगीत, स्वराधीश भरत बळवल्ली यांचे पार्श्वगायन यामुळे हा प्रयोग वेगळा ठरतो. या नाटकाचे ट्रेलर सध्या सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरले आहेत. नाटक प्रेक्षकापर्यंत पोहचविण्यासाठी हा वेगळ्या धाटणीचा कल्पक मार्ग रंगालयतर्फे अवलंबण्यात आला आणि लोकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद हेच ह्या कल्पक जाहिरात संकल्पनेच यश आहे.  त्यामुळेही या नाटकाच्या प्रयोगांबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com