नवे नाटक : इशारो इशारो में   (Review)

संतोष शाळिग्राम 
Saturday, 22 February 2020

अबोल मनाचा बोलका आविष्कार म्हणजे ‘इशारो इशारो में’. या नाटकाचं पोस्टर पाहिल्यावर सागर कारंडे याचे छायाचित्र ठळकपणे दिसतं. त्यावरून ‘चला हवा येऊ दे’ छापाचं काहीतरी असेल, असं काहीसं वाटतं.

अबोल मनाचा बोलका आविष्कार म्हणजे ‘इशारो इशारो में’. या नाटकाचं पोस्टर पाहिल्यावर सागर कारंडे याचे छायाचित्र ठळकपणे दिसतं. त्यावरून ‘चला हवा येऊ दे’ छापाचं काहीतरी असेल, असं काहीसं वाटतं. पण नाटक प्रत्यक्षात सुरू होऊन पुढं सरकतं, त्या वेळी अबोल इशाऱ्यातून उमटणाऱ्या चैतन्याची लहर मनाचा ताबा घेते. नाटकात रोमान्स आहे, भावनेला हात घालणारे प्रसंग आहेत. तरीही जरासं वेगळंपणही आहे. एक बोलका आणि एक अबोल या दोन जिवांच्या प्रेमाची ही गोष्ट. जिथं कुणाचा एक शब्दही ऐकू येत नाही, सारंच डोळ्यांनी समजून घ्यायचं आहे, अशा व्यक्तीचा आवाज होऊन हे नाटक मनाला हळवं करतं. ‘इशारा इशारा मा’ या मूळ गुजराती नाटकाचा हा मराठी नाट्याविष्कार आहे. स्वप्नील जाधव यांनी ते मराठीमध्ये आणलं आहे. या नाट्याला मराठमोळा टच देताना दिग्दर्शक जय कापडिया यांचा मूळ ढाचा मात्र कायम ठेवला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संगीतामध्ये करिअर करू पाहाणारा संजय (सागर कारंडे) आणि हॉटेलमध्ये काम करणारी मुकी-बहिरी सरगम (संजना हिंदपूर) हे एकमेकांच्या प्रेमात पडतात. घरातला जरासा विरोध गळून पडल्यानंतर त्यांचा संसार सुरू होतो. घरात पाळणा हलतो. इशाऱ्या इशाऱ्यानं चाललेल्या संसारात बोलकं बाळ येईल या आशेवर दोघेही खुश असतात. पण बाळही मुकं आणि बहिरंच. तरीही संसारातला गोडवा कमी होतं नाही. पण एक स्थिती अशी येते की संजय घटस्फोट घेण्यासाठी वकिलाकडं धाव घेतो. सुखानं चाललेल्या संसारात असं काय घडतं की एकदम प्रकरण घटस्फोटापर्यंत पोचतं?... याचं उत्तर शेवट देतोच. पण शेवटपर्यंत पोचणाऱ्या दोन अंकांच्या नाट्यवकाशात जे काही चैतन्य ओसंडून वाहत राहतं, त्याला काय म्हणावं? 

या चैतन्याचं नाव आहे संजना हिंदपूर. तिनं साकारलेली मुकी आणि बहिरी सरगम या नाटकाचा प्राण आहे. तिचं इशाऱ्यांतून बोलणं, इतर पात्रांशी बेमालूमपणे जुळणारी केमिस्ट्री अफलातून आहे. तिच्या तोंडून एका प्रसंगात येणारी किंकाळी हाच तिच्या वाट्याला आलेला एक संवाद. तरीही अख्ख नाटक ती व्यापून टाकते. नाटकभर तिनं धरून ठेवलेलं मुके-बहिरेपणाचं बेअरिंग केवळ कमाल आहे. सागर कारंडे नाटकभर तिचा आवाज होऊन जगतो. त्याचे काही प्रवेश हे ‘चला हवा येऊ दे’ छापाचे आणि पंच घेऊन हशा पिकविणारे आहेत, या नाटकाला त्याची फार गरज नाही. मुक्‍या मुलीचा आवाज होणारा प्रियकर आणि उत्तरार्धात मुलाच्या काळजी पछाडलेला बाप त्यानं चांगला साकारला आहे. या नाटकाला लाभलेली आणखी एक ‘ग्रेस’ म्हणजे परमेश्‍वर क्षीरसागर! बायकोच्या धाकात राहून वकिली करणारा बायकोचा गुलाम असलेला परमेश्‍वर उमेश जगतापनं चांगला उभा केला आहे. संजय आणि सरगमचं बाळ असलेल्या विघ्नेशच्या भूमिकेला प्रीत भारडिया चांगला न्याय देतो. अजय पुजारे यांचं दोन स्थळांचं नेपथ्य, राहुल रानडे यांचं संगीत आणि गुरू ठाकूर यांची गीतं दोन्ही नाटकाची उंची वाढवतात. मनोरंजनाचा हा टवटवीत आस्वाद नक्कीच घ्यायला हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New natak Review

Tags
टॉपिकस
Topic Tags: