शाहरुख-सलमानची 'इसकबाजी'; 'झिरो'चे नवे गाणे 'हिट'! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

शाहरुखने 'इसकबाजी' हे गाणं रिलीज केल्यानंतर ट्‌विटरवर याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या गाण्यामध्ये शाहरुखने सलमानच्या खास 'डान्स स्टेप्स'ही केल्या आहेत. 

मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले. या गाण्यात सलमानही आहे. 

मनोमिलन झाल्यानंतर सलमानच्या 'ट्युबलाईट' या चित्रपटात शाहरुख खानने पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती. आता शाहरुखच्या 'झिरो'मध्ये सलमानने पाहुणा कलाकार म्हणून काम केले आहे. या दोघांचा 'ब्रोमान्स' सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. शाहरुखने 'इसकबाजी' हे गाणं रिलीज केल्यानंतर ट्‌विटरवर याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या गाण्यामध्ये शाहरुखने सलमानच्या खास 'डान्स स्टेप्स'ही केल्या आहेत. 

आनंद एल. राय दिग्दर्शित 'झिरो' हा चित्रपट वर्षभरातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या विषयांपैकी एक आहे. या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा, कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरहिट मराठी संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या चित्रपटास संगीत दिले आहे, तर गीतकार इर्शाद कमील आहेत. शाहरुख-सलमानचे 'इसकबाजी' हे गाणे सुखविंदरसिंग आणि दिव्या कुमार यांनी गायले आहे. 

'झिरो' हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी देशभरात रिलीज होणार आहे.

Web Title: New song of Shahrukh Khan And Salman Khan from Zero release today