'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे 'हे' एकमेव 'मराठी' नाटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) आयोजित 'जश्न-ए-बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'राजा सिंह' या महाबालनाट्याची निवड झाली असून, देश विदेशातील अनेक बालनाटकांमधून ते निवडले गेले आहे. एकूण पंचवीस वेगवेगळ्या भाषांतील नाटकांचा समावेश असलेल्या 'जश्न-ए-बचपन' मध्ये सादर होणारे हे एकमेव 'मराठी' नाटक ठरले आहे.

रत्नागिरीतील 42 बाल युवा कलाकारांचा ताफा असलेल्या 'राजा सिंह' या महाबालनाट्याचे लेखन विवेक साठे यांनी केले आहे. प्रसिद्ध अभिनेते केतन क्षीरसागर यांनी दिग्दर्शन केले आहे. केतनने प्रथमच नाटकासाठी 'गीत-लेखन' देखील केले आहे. एकूण 16 गाणी असलेल्या या नाटकात केतनसह, लेखक विकेक साठे, शशिकला ओक आणि प्रामुख्याने तेजस रानडे यांनीही गाणी लिहिली आहेत. मयुरेश माडगावकर यांच्या सुश्राव्य सुरावटीनीं ती संगीतबद्ध झाली असून त्यांवर ताल धरायला लावणारी नृत्ये नृत्य दिग्दर्शक सिद्धेश दळवी यांनी साकारली आहेत. यातील गाणी रत्नागिरीतील चौदा बाल युवा गायकांनी व त्यांच्यासोबत अभिनेता अजिंक्य जोशी, चिन्मय मांडलेकर, गायक दत्तात्रय मेस्त्री, तेजस काळे, मयुरेश माडगावकर आणि गायक हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत.

NSD

निर्माते पूजा संदीप बावडेकर व संदीप बावडेकर यांनी या महाबालनाट्याचे शिवधनुष्य पेलले आहे. मराठी भाषेवर आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्व नाट्यकर्मी व नाट्यप्रेमींसाठी हा नक्कीच एक आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. सदर प्रयोग 24 नोव्हेंबर ला दिल्ली (NSD) येथे सादर होणार आहे. 

NSD

NSD

NSD


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is the only Marathi drama to be selected in Jashn e Bachpan