आईपणामुळे पात्रेही झाली जिवंत 

अरुण सुर्वे 
शुक्रवार, 4 मे 2018

माझ्या मुलीचा जन्म हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होय. मातृत्व अनुभवल्यामुळे माझा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आईपणामुळे मी साकारत असलेल्या पात्रांमध्ये अधिक खरेपणा आणि प्रामाणिकपणा झळकू लागला. 
- पल्लवी जोशी, अभिनेत्री 

मी मूळची मुंबईची. माझी आईदेखील मुंबईचीच आहे; पण माझे वडील मध्य प्रदेशातील इंदूरजवळच्या धार जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं माझे वडिलांकडचे बरेच नातेवाईक इंदूर, उज्जैन, देवासमध्ये स्थायिक आहेत. दादर हिंदू कॉलनीमधील किंग जॉर्ज शाळेत माझं शालेय झालं. तर बांद्रा येथील रिझवी कॉलेजमध्ये मी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. चित्रपट आणि नाटक क्षेत्राची पार्श्‍वभूमी असलेल्या आमच्या परिवाराची ही तिसरी पिढी आहे.

माझी आजी विमल घैसास आणि वडील हे दोघे बालगंधर्वांच्या गंधर्व नाटक कंपनीत काम करत होते. माझी आई शास्त्रीय गायिका आणि संगीत शिक्षिका होती. ती संगीतात एम. ए. करत असताना तिची आणि माझ्या वडिलांची भेट झाली आणि तिथून त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला सुरवात झाली. माझ्या वडिलांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्यासोबत 'माझा कुणा म्हणून मी', 'अकुलीना', 'मिलन' अशा अनेक नाटकांची निर्मिती केली. माझी बहीण पद्मश्री ही एक रंगकर्मी आहे. तिचा विवाह विजय कदम यांच्याशी झाला. त्यांचा मुलगा गंधार रॅप सिंगर आहे. माझा भाऊ प्रसिद्ध बालकलाकार होता मास्टर अलंकार. माझे पती विवेक अग्निहोत्री यांनी 'चॉकलेट', 'धनधान गोल', 'हेट स्टोरी', 'बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम' अशा अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, 'द ताश्‍कंद फाइल्स' या आमच्या आगामी चित्रपटाचेही दिग्दर्शन करत आहेत. पटकथाही त्यांनी लिहिली आहे. 

मी चार- पाच वर्षांची होते, तेव्हापासूनच माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरवात झाली. मी हिंदी आणि गुजराती चित्रपटांतून अभिनयाला सुरवात केली. 'खम्मा मारा वीरा' या द्विभाषिक गुजराती आणि 'रक्षाबंधन' या हिंदी चित्रपटात मी सुरवातीच्या काळात अभिनय केला आणि त्यासाठी मला गुजरात सरकारकडून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला. आतापर्यंत मी जवळपास 85 मालिका आणि 65 ते 70 चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. मात्र, माझा प्रत्येक परफॉर्मन्स हा त्याच्या मागील परफॉर्मन्सपेक्षा उत्तम ठरला. 'ये कहा आ गये हम' या मालिकेमधील रागिणी हे पात्र माझ्या खूप जवळचं आणि आवडतं आहे. 

pallavi joshi

सध्या मी 'ग्रहण' या मराठी मालिकेत अभिनय करत आहे. गूढ कथांचे आकर्षण मला पहिल्यापासूनच आहे. जेव्हा मला या मालिकेबाबत विचारले, तेव्हा मी नाही म्हणणार होते. परंतु, जेव्हा पटकथा वाचली, तेव्हा ती मला प्रचंड आवडली. त्यानंतर मी नारायण धारप यांची 'ग्रहण' ही कादंबरी वाचून काढली. आम्ही मालिकेचा गाभा ही कादंबरीच ठेवली असली तरी कथानकात बरेच बदल केले आहेत. व्यक्तिरेखांची नावेही बदलली आहेत. रमा या माझ्या पात्राच्या अनेक छटा आहेत. 

मी 'द ताश्‍कंद फाईल्स' नावाच्या चित्रपटाची निर्मिती करतेय. या चित्रपटाचे कथानक भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित आहे. त्यासोबत मी एक मालिकाही करतेय, ज्याबाबत मी खूप उत्सूक आहे. दरम्यान, माझा संपूर्ण आयुष्याचा प्रवासच अविस्मरणीय आहे. मी मागे वळून पाहण्यात वेळ घालवत नाही. मी नेहमीच पुढचा विचार करते. पण, जर सांगायचंच झालं तर माझ्या मुलीचा जन्म ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट आहे. मातृत्व अनुभवणं हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता. त्यामुळं माझा कामाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आईपणामुळं मी साकारत असलेल्या पात्रांमध्ये अधिक खरेपणा आणि प्रामाणिकपणा झळकू लागला, मग ते 'ग्रहण' असो, 'सा रे ग म प'मधील माझं सूत्रसंचालन असो किंवा 'बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम'. 

pallavi joshi

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pallavi Joshi Interview on Turning Point of Career