मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा 'पानीपत'

मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा 'पानीपत'

मुंबई : इसवी सन १७६१ मध्ये अहमद शाह अब्दाली आणि सदाशिवराव पेशवे यांच्यामध्ये पानिपतची घनघोर लढाई झाली. तब्बल अडीचशे वर्षांपूर्वीचा हा इतिहास आताच्या पिढीसमोर ठेवणे हे वाटते तितके सोपे काम नव्हते. कारण त्याकरिता प्रचंड संशोधन, खूप पेपरवर्क करावे लागणार होते. कारण पानिपतची लढाई ही भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई होती आणि त्यावर अडीच-तीन तासांचा चित्रपट काढणे मोठे आव्हानात्मक काम होते. परंतु आशुतोष गोवारीकरने हे आव्हान उत्तम पेलले आहे. 

‘पानिपत’च्या तिसऱ्या युद्धाचा हा थरारक आणि रोमांचक इतिहास अत्यंत कल्पकतेने आणि हुशारीने आशुतोषने या चित्रपटाद्वारे मांडला आहे. मराठ्यांची ही शौर्यगाथा सदाशिवराव पेशवे यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या नजरेतून ‘पानिपत’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. कलाकारांचा अभिनय, कला-दिग्दर्शन, संगीत-दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी अशा चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. 

चित्रपटाच्या कथेला सुरुवात मराठ्यांनी उद्‌गीरचा किल्ला काबीज केल्यापासून होते. युद्ध जिंकल्यामुळे सदाशिवरावभाऊ (अर्जुन कपूर) यांचा दरबारामध्ये नानासाहेब पेशवे (मोहनीश बहेल) सन्मान करतात. त्याच वेळी सदाशिवरावभाऊ इब्राहिम खान गारदीला आपल्या सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतात. एकूणच सदाशिवरावांचा वाढत चाललेला मानसन्मान आणि पराक्रम  नानासाहेबांची पत्नी गोपिकाबाई (पद्मिनी कोल्हापुरे) हिला काहीशी खटकत असतो.

उद्या पेशव्यांच्या गादीवर सदाशिवराव हक्क सांगतील, अशी तिला भीती वाटत असते. तिला आपला मुलगा विश्‍वासराव (अभिषेक निगम) याला गादीवर बसवायचे असते. त्यामुळे ती आपली भीती नानासाहेबांकडे व्यक्त करते. मग सदाशिवरावभाऊ यांना युद्धातून धनमंत्री म्हणून कामकाज पाहावे लागते. इकडे राजवैद्यांची मुलगी पार्वतीबाई (क्रिती सेनॉन) ही सदाशिवराव यांच्यावर प्रेम करू लागते. नंतर त्यांचा विवाह होतो. दुसरीकडे दिल्लीची गादी मिळविण्यासाठी नजीब उदौला (मंत्रा) अफगाणिस्तानचा बादशहा अहमद शहा अब्दालीची मदत घेतो. अशा वेळी देशाला वाचविण्यासाठी मराठ्यांची फौज नजीब आणि अब्दालीला शह देण्यासाठी सज्ज होते. मराठ्यांच्या या फौजेचे नेतृत्व सदाशिवरावभाऊ करतात आणि त्यांच्यामध्ये व अहमद शहा अब्दालीमध्ये पानिपतची लढाई होते. 

ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात आशुतोष गोवारीकर माहीर आहे आणि त्याने ही मराठ्यांच्या शौर्याची ही गाथा सांगितली आहे. अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, पद्मिनी कोल्हापुरे, संजय दत्त, मोहनीश बहल, गश्‍मीर महाजनी आदी सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. सदाशिवराव पेशवा ही भूमिका तितकीच आव्हानात्मक होती. तलवारबाजी, घोडेस्वारी अशा अनेक गोष्टी शिकाव्या लागणार होत्या. परंतु अर्जुन कपूरने ही भूमिका वकुबीने साकारली आहे. त्याने कसरत आणि मेहनत घेतली आहे हे चित्रपट पाहताना जाणवते. संजय दत्तची अब्दालीची क्रूर आणि निष्ठूर अशी भूमिका आहे आणि त्याने डोळ्यांतून ही भावना छान व्यक्त केली आहे. विशेष कौतुक करावे लागेल ते क्रिती सेनॉनचे. पार्वतीबाईची व्यक्तिरेखा तिने कमालीची साकारली आहे. तिचा परफॉर्मन्स आऊटस्टॅण्डिग आहे.

चित्रपटाचे कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आहेत आणि त्यांनी या कथेला काळाशी सुसंगतच ते केले आहे. भव्य-दिव्य सेट्‌स, हत्ती आणि घोडे सारा तामजाम झकास. चित्रपटातील संगीत तजेलदार झाले आहे. त्याबद्दल संगीतकार अजय-अतुल यांचे कौतुक करावेच लागेल. मात्र आशुतोष गोवारीकरचा चित्रपट म्हटलं की त्याची लांबी मोठी असणार यात शंका नाही. या चित्रपटाच्या बाबतीत असेच झाले आहे. काहीशी लांबी खटकणारी वाटते. एकूणच सांगायचे तर मराठ्यांच्या शौर्याला, त्यांच्या खंबीरपणाला, पराक्रमाला आणि लढवय्या वृत्तीला सलाम करायला हवा आणि आपला हा इतिहास नक्कीच पाहायला हवा.

web title : 'Panipat' narrating the heroic story of the Marathas

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com