"रझिया', "अमला'मुळं अभिनयाला नवं वळण 

शब्दांकन : अरुण सुर्वे
सोमवार, 24 एप्रिल 2017

रझिया सुलतान' ही मालिका माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला नवं वळण देणारी ठरली. प्रेक्षकांनी त्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळं मला आकाश ठेंगणं झालं होतं. आता "क्‍या कुसूर है अमला का?' मालिकेतील प्रमुख भूमिका साकारायला मिळणं, ही अशीच मोठी गोष्ट आहे. 
- पंखुडी अवस्थी, अभिनेत्री 

माझा जन्म लखनौमध्ये झाला असला तरी, मी लहानाची मोठी दिल्लीत झाले. ब्ल्यू बेल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं, तर हिंदू कॉलेजमधून मी पदवी घेतली. माझं कुटुंब अगदी साधं आहे. माझे वडील नोकरी करतात आणि आई गृहिणी आहे. माझ्या पालकांनीच मला माझ्या करिअरसाठी खूप आधार दिला. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मी ड्रामा सोसायटीची सदस्या झाले. तेव्हापासूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्या वेळी मी अनेक नाटकांत भूमिका साकारल्या आणि ड्रामा सोसायटीची सलग दोन वर्ष अध्यक्षही होते. 

कॉलेजमध्ये असतानाच मी पहिली भूमिका "यह है आशिकी'मध्ये साकारली आणि नंतर "फना'च्या दुसऱ्या आवृत्तीतही होते. "रझिया सुलतान'मध्ये मला प्रथमच मध्यवर्ती भूमिका मिळाली. नंतर "सूर्यपुत्र कर्ण'मध्ये द्रौपदीची भूमिका साकारली. आता "क्‍या कुसूर है अमला का?' या मालिकेमध्ये "अमला'ची मुख्य भूमिका साकारत आहे. 
"अमला'ची भूमिका मिळेपर्यंत माझी सर्वोत्तम भूमिका ही "रझिया सुलतान'ची होती. "अमला' ही ताकदवान व्यक्तिरेखा असून, ती अस्सल वाटते. अमला ही धरमशाला येथे राहणारी साधी, निरागस आणि जगाकडे विस्मयचकित नजरेने पाहणारी स्वच्छंदी मुलगी असते. तिला जगाचा फारसा अनुभव नसला तरी, ती मनानं सच्ची आणि आशावादी असते. ही केवळ एका अमला नावाच्या मुलीची कथा नाही, तर ती प्रत्येक महिलेतील स्त्रीत्वाची कहाणी आहे. धरमशालासारख्या छोट्या गावात परंपरेचा पगडा असतो. यातील विविध व्यक्तिरेखा या अस्सल असून, त्यांचा भावनिक प्रवास अतिशय गुंतागुंतीचा असतो. एका घृणास्पद प्रसंगानं "अमला'चं विश्‍व कोलमडून पडतं; परंतु असं असूनही सारं काही संपलेलं नाही, आशेला जागा आहे, या शाश्‍वत सत्याची तिला होणारी जाणीव याची ही कथा आहे. ही मालिका म्हणजे जगभरात लोकप्रिय झालेल्या "फातमागुल' या तुर्की मालिकेचे रूपांतर आहे. श्रद्धा, आशा आणि प्रेम या त्रिसूत्रीवर जीवनाचं तत्त्व आधारित असून त्याचा शोध घेणं ही या मालिकेची मुख्य संकल्पना आहे. सध्या मी या मालिकेवरच लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात, एखादी चांगली भूमिका माझ्याकडे आली, तर मी ती निश्‍चितच स्वीकारीन. एक अभिनेत्री म्हणून मला रोज विकसित व्हायचं आहे. 

"यह है आशिकी'मध्ये मला भूमिका मिळाली, तो माझ्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय प्रसंग होता. आपली पहिली भूमिका ही नेहमीच आपल्यासाठी खास असते. "रझिया सुलतान' ही मालिका माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला नवं वळण देणारी ठरली. नायिकेची भूमिका मिळणं हेच मोठं आव्हान असतं. मला ते यशस्वीरीत्या पेलायचं होतं. मात्र, प्रेक्षकांनी त्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळं मला आकाश ठेंगणं झालं होतं. आता "क्‍या कुसूर है अमला का?' या मालिकेतील प्रमुख भूमिका आणि इतकी शक्तिशाली व्यक्तिरेखा साकारायला मिळणं, ही अशीच मोठी गोष्ट आहे. 

"रझिया सुलतान' ही मालिका माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला नवं वळण देणारी ठरली. प्रेक्षकांनी त्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिल्यामुळं मला आकाश ठेंगणं झालं होतं. आता "क्‍या कुसूर है अमला का?' मालिकेतील प्रमुख भूमिका साकारायला मिळणं, ही अशीच मोठी गोष्ट आहे. 
- पंखुडी अवस्थी, अभिनेत्री 
 

Web Title: pankhuri avasthi turning point