बॉलिवूडमधून संन्यास घेतलेली 'ही' अभिनेत्री बनली गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बॉलिवूडमधून संन्यास घेतलेल्या 'या' अभिनेत्रीने गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेडची जागा मिळवली आहे. 

'घर से निकलते ही.. कुछ दूर चलते ही.. रस्ते में है उसका घर..' या गाजलेल्या गाण्यात दिसलेल्या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता. पण सध्या ही अभिनेत्री गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे! 'पापा कहते है' या चित्रपटात जुगल हंसराज सोबत दिसलेली मयुरी कांगो हे नाव चित्रपटाच्या दुनियेत जरी चमकले नसले तरी तिच्या लूक्सची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून मयुरी चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. सध्या ती कुठे आहे आणि काय करते आहे हे कुणालाच माहित नव्हते. पण गुगल इंडियाशी मयुरीचे नाव जोडल्या गेल्यानंतर ती आता चर्चेत आली आहे.

mayuri kango

मयुरी कांगो ही परफॉर्मिस्ट डॉट रिझल्ट्रीक्स कंपनीच्या पब्लिसीस ग्रुपची मॅनेजिंग डायरेक्टर होती. ही गुरगाव येथील कंपनी होती. आता ती गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे. हे ऐकून सध्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. मयुरीने निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'पापा कहते है' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. काही महिन्यांपूर्वी मयुरीने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 'मी एकूण 16 चित्रपट केले होते. पण त्यातले अर्ध्याहून अधिक प्रदर्शित झालेच नाही. 1999  हे वर्ष अभिनेत्रींसाठी फारसे चांगले नव्हते. मला चित्रपटात झाडाच्या मागे-पुढे डान्स करायला सांगायचे. त्यानंतर मी पटकथा लिखाण आणि डॉक्युमेंटरीवर लक्षकेंद्रित केले. 2000 मध्ये मी टीव्हीकडे वळले आणि काही वर्षानंतर लग्न करून मी यूएसला शिफ्ट झाले.' 

यूएसला शिफ्ट झाल्यानंतर मयुरीने अभिनयाला राम राम ठोकला आणि न्यूयॉर्कमधील 360 आय या डिजीटल एजन्सीमध्ये तिने नोकरी केली. त्याच कंपनीत तिला मिडीया मॅनेजर या पदावर बढती मिळाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: papa kehte hain actress Mayuri Kango joins google india as a industry head