'पीएम नरेंद्र मोदी'चे प्रदर्शन लांबणीवर

गुरुवार, 4 एप्रिल 2019

- अनिश्‍चित काळासाठी प्रदर्शन लांबणीवर - चित्रपटाचे निर्माते संदीप एस. सिंह यांची घोषणा

मुंबई : झळकण्याआधीच वादात सापडलेल्या "पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे प्रदर्शन अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आले आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप एस. सिंह यांनी आज ही घोषणा केली. हा चित्रपट उद्या (ता. 5) झळकणार होता. 

चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (सीबीएफसी) प्रमाणपत्र या चित्रपटाला अद्याप मिळाले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मूळ वेळापत्रकानुसार हा चित्रपट येत्या 12 एप्रिल रोजी देशभरात झळकणार होता; पण "लोकाग्रहास्तव' लक्षात घेऊन त्याची प्रसिद्धी एक आठवडा आधी, म्हणजे पाच एप्रिल रोजी करण्याचे ठरले. मात्र, उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे संदीप सिंह यांनी ट्‌विटरवरून जाहीर केले आहे.

दरम्यान, प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचे कारण त्यांनी जाहीर केले नसले, तरी "सीबीएफसी'चे प्रमाणपत्र या चित्रपटाला अद्याप मिळाले नसल्याचे सूत्रांनी नमूद केले.