'मै देश नहीं मिटने दुंगा', 'पीएम नरेंद्र मोदी' अखेर रिलीज

संतोष भिंगार्डे
शनिवार, 25 मे 2019

मोदी यांच्या बालपणापासून ते पीएम पदापर्यंत त्यांची वाटचाल कशी झाली, हे चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

पीएम नरेंद्र मोदी 

चर्चा रंगलेली आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, रेल्वे स्टेशन आणि बसस्थानके, रिक्षा तसेच टॅक्‍सी... सगळीकडे मोदी... मोदी आणि मोदीच आहेत. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास रेखाटणारा... सगळ्यांना प्रेरणा देणारा... त्यांच्या जीवनातील चढ-उतार मांडणारा "पीएम नरेंद्र मोदी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

Image result for pm narendra modi movie hd poster

मोदी यांच्या बालपणापासून ते पीएम पदापर्यंत त्यांची वाटचाल कशी झाली, हे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. मोदींच्या वडिलांचे चहाचे दुकान होते. मोदीदेखील रेल्वेमध्ये चहाच विकायचे. मोदींची आई घर सांभाळायची. जेव्हा मोदी तरुण वयात येतात तेव्हा त्यांचे आई-वडील त्यांच्या लग्नाचा विचार करीत असतात. पण मोदी आपल्याला संन्साशी बनायचे आहे, असे घरच्यांना सांगतात आणि घर सोडून हिमालयात जातात. तेथे आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय याचा शोध घेतात आणि येथे पुन्हा येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सहभागी होतात. त्यांची हुशारी आणि धाडसी स्वभाव पाहता जीवनात ते एकेक पायरी पुढे सरकत असतात. 

modi movie poster

मेरी कोम, सरबजित यांसारखे चित्रपट बनविणाऱ्या ओमंग कुमार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी केला आहे. विवेक ओबेरॉय, मनोज जोशी, यतीन कार्येकर, किशोरी शहाणे-विज आदी कलाकारांनी उत्तम काम केले आहे. विवेकने मोदींची भूमिका साकारण्यासाठी घेतलेली मेहनत नक्कीच जाणवते. अमित शहा यांची भूमिका अभिनेते मनोज जोशी यांनी उत्तम वठविली आहे. चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे. विशेष म्हणजे हिमालयातील दृश्‍ये छान टिपण्यात आली आहेत. चित्रपटातील संवाद दमदार-धारदार आहेत. चित्रपटाची गती छान राखण्यात आली आहे. हा चित्रपट दोन भागात विभागण्यात आला आहे. पहिला भाग मोदींचे बालपण ते गुजरातची दंगल आणि दुसऱ्या भागात त्यांचा पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. एकूणच हा नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास पाहावा असाच आहे. 

साडेतीन स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Hindi Movie released