'गल्ती से मिस्टेक हो गया' सर, विजू खोटेंचे डायलॉग आणि भूमिका

टीम ईसकाळ
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विजू खोटेंच्या भूमिका छोट्या असल्या तरी, त्याशिवाय ते सिनेमे पूर्ण होऊ शकणार नाहीत, असे वाटते.

मुंबई : सिनेमामध्ये तुम्हाला मोठी भूमिकाच मिळायला पाहिजे, असं काही नाही. एखादी छोटी भूमिका मिळाली तरी, तुम्ही ती प्रामाणिकपणे वठवली तर, ती कायम स्मरणात राहू शकते, हे विजू खोटे यांनी दाखवून दिलंय. त्यांच्या भूमिका छोट्या असल्या तरी, त्याशिवाय ते सिनेमे पूर्ण होऊ शकणार नाहीत, असे वाटते.

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

गल्ती से मिस्टेक हो गया
अंदाज अपना अपनामधील विजू खोटे यांची भूमिका त्यातल्या त्यात थोडी मोठी होती. रॉबर्टच्या व्यक्तिरेखेला विजू खोटे यांनी त्यांच्या डायलॉगच्या माध्यमातून अजरामर करून टाकलंय. 'गल्ती से मिस्टेक हो गया', हा त्यांचा डायलॉग सिनेमाभर तुम्हाला ऐकायला मिळतो. तर, क्लायमॅक्समध्ये 'मार्क होना चाहिये' या डायलॉगमध्ये त्यांनी दाखवलेली सहजता तुम्हाला पोट धरून हसायला लावते. 

viju khote in andaz apna apna

शोले आणि विजू खोटे
शोलेतील विजू खोटे यांची भूमिका फार मोठी नव्हती. त्या तीन-साडेतीन तासांच्या सिनेमात कालिया फार फार तर १५ मिनिटे पडद्यावर होता. पण, तो भारतीय सिने रसिकांच्या मनाच्या पडद्यावर आजही कायम आहे. विजू खोटे यांच्या वाट्याला  'सरदार मैने आपका नमक खाया है सरदार' हा एका ओळीचा डायलॉग आला होता. त्याचंही त्यांनी सोनं केलं. 

viju khote in sholay

बनवाबनवीमधील बळी
बनवाबनवी या मराठीतील अजरामर सिनेमाला नुकतीच ३० वर्षे झाली. पण, त्या सिनेमातील व्हिलन बळी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हीच विजू खोटे यांची खासियत होती. ज्या सहजतेनं त्यांनी विनोदी भूमिका केल्या. तितक्याच सहजतेनं त्यांनी व्हिलनही केला. त्यामुळेच आज, बनवाबनवी सिनेमावर प्रेम करणाऱ्यांना बळी लक्षात राहतो. 

छोट्या भूमिका केल्या अजरामर
विजू खोटे यांच्या मिळालेल्या भूमिका खूप मोठ्या होत्या असे नाही. पण, त्यांची छोट्यातील छोटी भूमिकाही लक्षात राहणारी होती. काही वर्षांपूर्वी 'अतिथी तुम कब जाओगे' हा सिनेमा आला होता. परेश रावलने अतिशय उत्तम भूमिका करून हा सिनेमा अक्षरशः खाऊन टाकला होता. पण, त्यातही विजू खोटे यांनी, अभिनेते विजू खोटे यांचीच भूमिका केली होती. परेश रावलचं कॅरेक्टर सतत त्यांना शोलेतील डायलॉग म्हणायला लावत असल्याचं दाखवलं होतं. त्या छोटेखानी भूमिकेतही विजू खोटे यांनी जीव आणला होता.

राजकुमार संतोषी आणि विजू खोटे
दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि विजू खोटे हे एक समीकरणच होतं. संतोषी यांच्या प्रत्येक सिनेमात विजू खोटे यांची छोटी का असेना भूमिका असायची. घातक, चायना गेट, अंदाज अपना अपना, संतोषी यांच्या सिनेमांमध्ये तुम्हाला विजू खोटे दिसतील.

viju khote rajkumar santoshi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: popular characters of veteran actor viju khote