Tendlya Movie Review : ‘तेंडल्या’चा चेंडू थेट सीमापार, काळजाला भिडणारी सहज-सुंदर गोष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tendlya Movie Review : ‘तेंडल्या’चा चेंडू थेट सीमापार, काळजाला भिडणारी सहज-सुंदर गोष्ट

Tendlya Movie Review : ‘तेंडल्या’चा चेंडू थेट सीमापार, काळजाला भिडणारी सहज-सुंदर गोष्ट

महिमा ठोंबरे

‘बारकी गोष्ट, मोठी गोष्ट असं काही नसतं. गोष्ट ही गोष्ट असते’, असा एक संवाद ‘तेंडल्या’ चित्रपटात गजा या पात्राच्या तोंडी आहे. चित्रपटाचे वर्णन करण्यासाठी हा अतिशय चपखल आहे. तसे पाहायला गेल्यास चित्रपटाची गोष्ट अतिशय ‘बारकी’, साधी-सोपी अन् सरळ आहे. पण याच साधेपणामुळे आणि त्यातल्या सच्चेपणामुळे ही गोष्ट आपल्या काळजाला भिडते आणि ‘तेंडल्या’चा चेंडू थेट सीमापार पाठवते.

चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि ट्रेलरवरून सचिन तेंडुलकरवर जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांवर हा चित्रपट बेतलेला असल्याचे सहज लक्षात येते. चित्रपटाची कथा त्याभोवतीच फिरेल, असा अंदाज असतो. हा अंदाज खरा आहे, मात्र हे कथेचे केवळ सूत्र आहे. ही कथा इस्लामपूर जवळील एका छोट्याशा गावात घडते. गजा आणि तेंडल्या, हे दोघे कथेचे मध्यवर्ती नायक आहेत

मात्र, त्यांच्यासह अनेक उपकथानकांच्या जोडीने गोष्ट पुढे सरकत जाते. सचिन तेंडुलकरने दिलेल्या स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीला हा चित्रपट अर्पण करण्यात आला आहे. तीच जिद्द, तीच उमेद चित्रपटभर व्यापून राहते.

१९९७-९८ च्या दरम्यान घडणारी ही गोष्ट. तो काळ अगदी हुबेहुब उभा करण्यात आला आहे. गजा आणि तेंडल्या, दोघेही क्रिकेटच्या, त्यातही तेंडुलकरच्या वेडाने झपाटलेले. त्यांच्या आयुष्यात श्वासाइतका तेंडुलकर महत्त्वाचा झालेला. याच प्रेमातून दोघांचंही एक स्वप्न जन्माला येतं. तेंडुलकरचा खेळ पाहण्यासाठी इतरांच्या घरी जाऊन विनवण्या करून टीव्ही पाहण्याला वैतागलेला गजा स्वतःच्या घरी रंगीत टीव्ही घेण्याचं स्वप्न बघतो. तर, तेंडुलकरसारखी ‘एमआरएफ’ची बॅट घेऊन गावातल्या पोरांना हरवण्याच्या स्वप्नाने तेंडल्याला पछाडलेलं असतं. त्यांची ही स्वप्न पूर्ण होतात का, हे चित्रपटात पाहणंच इष्ट.

कथेचा शेवट अपेक्षित असला, तरी ‘मेलोड्रमा’ न करता अनपेक्षित सहजतेने होतो. त्यामुळेच शेवटी एका प्रसंगी आपसूकच आपणही पात्रांच्या आनंदात सामील होत जल्लोष करतो. ही सहजताच चित्रपटाचे बलस्थान आहे. ग्रामीण भागातील कथा खरोखर तो भाग अनुभवलेल्या लोकांनी सांगितल्यामुळे त्यात अस्सलपणा आहे. संवादातही कुठेच कृत्रिमपणा नाही. अगदी अखेरीसही पात्रांच्या तोंडून जीवनोपदेशक वाक्य टाकण्याचा मोह लेखक-दिग्दर्शकांनी टाळला, हे उत्तम.

लेखकाने कथेचा योग्य वेग सांभाळला आहे आणि कॅमेऱ्यानेही सुंदर फ्रेम्स टिपल्या आहेत. दिग्दर्शक सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर यांनी पदार्पणातच कमाल केली आहे. उत्तम काही हाती लागल्यावर काय करू आणि काय नको, असे होते. यातील ‘काय नको’ हे या दोघांना पुरते उमजल्यामुळे चित्रपटाची भट्टी त्यांनी भन्नाट जमवली आहे. गजाच्या भूमिकेत असलेल्या फिरोज शेखचे काम सर्वाधिक लक्षात राहते. प्रचंड बोलक्या डोळ्यांचा आणि देहबोलीचा त्याने उत्तम वापर केला. तेंडल्याच्या भूमिकेतील अमन कांबळेची निरागसता भाव खाऊन जाते. सगळ्याच कलाकारांची कामे तोडीस तोड झाली आहेत. विशेषतः शाळकरी मुलांची कामे केलेल्या सगळ्या कलाकारांनी ‘दंगा’ केला आहे.

नव्वदच्या पिढीला ‘नॉस्टॅल्जिक’ होण्याची संधी चित्रपट देतो. क्रिकेटसोबतच माहेरची साडी, बॉर्डर हे चित्रपट, अलिफ लैला, आयवाचा रंगीत टीव्ही हे सगळे संदर्भ त्या काळाच्या आठवणी ताज्या करतात. मात्र हा केवळ त्या काळाचा चित्रपट नाही, त्यातल्या जिद्दीमुळे तो सार्वकालिक आहे. हा केवळ क्रिकेटवेड्यांचा, सचिन तेंडुलकर आवडणाऱ्या माणसांचा नाही, तर माणसांचे माणूसपण दाखवणारा चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीतील माणसांनी आवर्जून पाहावा, असाच आहे.