Saaho Review : अॅक्शन, मसाला अन् थ्रिलरवाला 'साहो'

महेश बर्दापूरकर 
Friday, 30 August 2019

प्रभास या नायकाच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असून, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, मंदिरा बेदी अशी तकडी स्टारकास्ट असल्यानं साहो ‘पैसा वसूल’ आहे... 

प्रभास या दक्षिणेतील स्टारचा ‘बाहुबली़ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीला हलवून गेला होता. याच कलाकाराचा बहुप्रतिक्षित ‘साहो’ हा सुजीत दिग्दर्शित चित्रपट भव्य, तुफान अॅक्शन, ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ या हॉलिवूडच्या मालिकेप्रमाणे गाड्यांच्या नेत्रदीपक स्टंटची आठवण करून देणार आहे. मात्र, चित्रपटाची कथा आणि पटकथा यांवर मात्र फारसं काम केलं गेलेलं नाही. संकलनातही चित्रपट कमी पडला असून, तीन तासांची लांबी असल्यानं चित्रपट अनेकदा कंटाळवाणाही झाला आहे. अर्थात, प्रभास या नायकाच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असून, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, मंदिरा बेदी अशी तकडी स्टारकास्ट असल्यानं चित्रपट ‘पैसा वसूल’ आहे... 

saaho

‘साहो’च्या कथेची सुरवात होते मुबंईमध्ये. रॉय (जॅकी श्रॉफ) या डॉनचा त्याचा सहकारी देवराज (चंकी पांडे) खात्मा करतो. आता त्याच्या प्रॉपर्टीपर्यंत नेणारा ब्लॅक बॉक्स कोणत्या बॅंकेत आहे याचा शोध सुरू होतो. जय (नील नितीन मुकेश) हा चोर हा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्याच्या तयारीत असतो आणि त्याचवेळी अशोक (प्रभास) आणि त्याची सहकारी अमृता (श्रद्धा कपूर) हे पोलिस दलातील (एकमेकाच्या प्रेमातीलही) विशेष अधिकारी हा प्लॅन उधळून लावण्याच्या प्रयत्नात असतात. पोलिस जयला पकडतात, मात्र कथेत भला मोठा ट्विस्ट येतो. आता सगळ्या पात्रांची ओळख बदलते आणि चोर पोलिसाचा खेळ नव्यानं सुरू होतो. कथेत प्रवेश केलेलं साहू कोण असतो, अमृता आणि अशोकच्या प्रेमाचं काय होतं, जय नक्की कोण असतो, रॉयच्या हत्येचं रहस्य काय असतं, ब्लॅक बॉक्स नक्की कोणाच्या हाती लागतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चित्रपटाचा तुफान अॅक्शननं भरलेला उत्तरार्ध पाहणं अधिक रजंक... 

चित्रपटाची कथा हिंदीतील ‘रेस’ मालिका व हॉलिवूडची ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस’ मालिका पाहिलेल्यांसाठी ‘सोपा’ पेपर आहे. कथेतील ट्विस्ट अनुभवी प्रेक्षकांसाठी फारसे धक्कादायक ठरत नाहीत. कथेचा पहिला भाग ताशी ४० किलोमीटरच्या वेगानं धावतो, तर उत्तरार्ध २०० किलोमीटरच्या! प्रभासच्या एन्‍ट्रीनंतरचे प्रसंग खूपच हळुवार आहेत. टिपिकल हिंदी चित्रपटातील प्रेमप्रकरण व संवाद यांमुळं हा भाग फारसा वेगळा ठरत नाही. कथेमध्ये ट्विस्ट आल्यानंतर ती परदेशात जाऊन पोचते आणि वेगही पकडते. हा सगळा भाग हॉलिवूडच्या चित्रपटालाही लाजवेल अशा अॅक्शन भरलेला असून, यासाठी निर्मात-दिग्दर्शक कौतुकास पात्र आहेत. विशेषतः मोठ्या पुलावर महाकाय ट्रक, कार, मोटरसायकल आणि हेलिकॉप्टरची धुमश्‍चक्री डोळ्याचं पारणं फेडणारी झाली आहे. कथा शेवटी पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट घेते आणि काही हळवे संदर्भ देत लक्षात राहणारा शेवटाला जाऊन पोचते. आर. माधी या तमीळ सिनेमॅटोग्राफरनं मुंबईसह परदेशातील लोकेशन्सवर चित्रित केलेला थरार चित्रपटाचं मोठं बलस्थान आहे. ‘बॅड बॉय’ हे बादशहाच्या आवाजातील गाणं त्यातल्या त्यात जमून आलं आहे. 

saaho

प्रभास या देखण्या अभिनेत्याच्या अॅक्शन, स्टाइल, संवादफेक हेच चित्रपटाचं मोठं आकर्षण ठरतं. पहिल्या भागातील हळुवार भूमिकेतही त्याची छान छाप पडते. अॅक्शन सिक्वेन्समध्ये त्याचा अभिनय आणखीनच बहरतो. त्याचे हिंदीत डब केलेले संवाद मात्र काही ठिकाणी समजायला अवघड जातात. श्रद्धा कपूरच्या वाट्याला मोठी आणि आव्हानात्मक भूमिका आला आहे. प्रभासप्रमाणं तिलाही हळवी भूमिका आणि अॅक्शनचा मिलाफ साधण्याची संधी मिळाली आहे व ती तिनं ताकदीनं पेलली आहे. दोघांची जुळलेली केमिस्ट्री कथेतील कंटाळवाणा भागही सुसह्य बनवते. चंकी पांडेच्या वाट्याला आलेली व्हिलनची भूमिका छान लिहिली गेली आहे आणि त्याचा अभिनयही सरप्राईज पॅकेज ठरते. नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मंदिरा बेदी यांनी आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. 
एकंदरीतच, चित्रपटातील सर्वच गोष्टी अत्यंत भव्य आहेत व प्रभासच्या अॅक्शनच्या माध्यमातून निर्माण केलेले हे पैसा वसूल मनोरंजन एकदा अनुभवायला काहीच हरकत नाही. 

स्टार : 3


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prabhas and Shraddha Kapoor starer hindi movie Saaho review