प्रसाद ओक विचारतोय, सरकारला जाग कधी येणार??

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

या आठवड्यात ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ हे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ‘ये रे ये रे पैसा 2’ला चित्रपटगृह मिळत नसल्याचे समोर आले. अभिनेता प्रसाद ओक याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई : अमेय खोपकर निर्मित ‘ये रे ये रे पैसा 2’ चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रसाद ओक, संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात दमदार कमाई केली. परंतू या आठवड्यात ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ हे दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ‘ये रे ये रे पैसा 2’ला चित्रपटगृह मिळत नसल्याचे समोर आले. अभिनेता प्रसाद ओक याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. 

सरकारला कधी जाग येणार????
भारताच्या स्वातंत्र्य दिनी
महाराष्ट्रातूनच मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय... 
"ये रे ये रे पैसा 2" हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. 
ह्या चित्रपटाने गेल्या आठवड्यात उत्तम पैसे कमवूनसुद्धा ह्या आठवड्यात ह्या चित्रपटाला थिएटर्स मिळवण्यासाठी झगडावे लागत आहे कारण दोन हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. ही मराठी चित्रपटांची महाराष्ट्रातील अवस्था आहे आणि जर हे असंच चालू राहिलं तर मराठी निर्मात्यांनी पैसे कमवायचे तरी कसे...???? 

अमेय खोपकर गेली 12 वर्षे मराठी सिनेमांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडत आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना थिएटर्स मिळवून दिली आहेत आणि आज त्यांचा स्वतःचा सिनेमा असल्यामुळे ह्या चित्रपटासाठी भांडणे त्यांच्या तत्वात बसत नाही. पण आता पाळी आपली आहे आपण म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टीने त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे..!!

अशा शब्दात प्रसाद ओकने आपल्या फेसबुकपोस्टवर सरकारी धोरणांबद्दल राग व्यक्त केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prasad Oak criticizes state government on social media