
Prasad Oak: नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो कारण.. प्रसाद ओक जरा स्पष्टच बोलला..
prasad oak: अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा ठरलेला आहे. प्रसादच्या प्रत्येकच कलाकृतीवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.
त्याचे 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' हे दोन्ही सिनेमे हिट ठरले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले होते तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली होते. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. त्यामुळे सध्या त्याची बरीच हवा आहे.
त्याच्या या प्रवासात त्याला भक्कम साथ दिली ती त्याच्या बायकोने म्हणजेच मंजिरी ओकने. प्रसाद मंजिरी विषयी कायमच भरभरून बोलत असतो. कारण जेव्हा त्याने मनोरंजन क्षेत्रात करियर करायचं ठरवलं तेव्हा त्याला नातेवाइकांनीच प्रचंड विरोध केला, त्यावेळी मंजिरी त्याच्यासोबत उभी होती. नुकत्याच एका मुलाखतीत तो नातेवाईकांविषयी थोडं परखडपणे बोलला आहे.
(prasad oak said i hate relatives because only my wife manjiri oak support me in career)
या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, 'माझ्या यशात मंजिरीचा १०० टक्के वाटा आहे. १९९६ साली तिने मला पुणे सोडून मुंबईला जाण्यास सांगितलं. तिच्यामुळेच आज मी इथे आहे. मुंबईत आल्यानंतर दोन वर्षांनी १९९८ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरही एक वर्ष मी एकटाच मुंबईत होतो. त्यानंतर १९९९ मध्ये मंजिरी मुंबईला आली. त्यानंतर आमचा संसार सुरू झाला.'
'या संपूर्ण काळात घर, मुलांची जबाबदारी, त्यांचं शिक्षण आणि नातेवाईक हे सगळं तिने सांभाळलं. नातेवाईक हा अत्यंत किचकट आणि अत्यंत वैताग येणारा प्रकार आहे. सुरुवातीच्या काळात नातेवाईकांकडून अभिनय हे काय क्षेत्र आहे? यात काय करिअर होणार आहे का? यापेक्षा चांगली बँकेत नोकरी बघितली असतीस…असं मला ऐकवलं जायचं. आज २२-२५ वर्षांनंतर तेच नातेवाईक त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर फोटो काढायला पाठवतात. हेही मला आवडत नाही,' असं प्रसाद अगदी स्पष्टपणे बोलला.
पुढे तो म्हणाला, “नातेवाईक हा प्रकारच मला नकोसा वाटतो. त्यांच्याकडून कधीच काही चांगलं मला मिळालं नाही. मला जे काही दिलं ते माझ्या बायकोने दिलं. माझ्या शिक्षकांनी माझ्यावर संस्कार केले. आईने मला गाणं दिलं. पण नातेवाईकांनी मला काहीच दिलं नाही. आज ते ही मुलाखत पाहत असतील तर त्यांना कदाचित वाईट वाटत असेल.. पण वाटू दे.. मी त्याला काहीच करू शकत नाही..' असं परखड मत त्याने या मुलाखतीत मांडलं आहे.