Sakal Premier Award 2023: प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, असा करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Premier Award 2023

Sakal Premier Award 2023: प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद, असा करा अर्ज

Sakal Premier Award 2023

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’ची घोषणा होताच मराठी चित्रपटसृष्टीतून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पुरस्कारासाठी प्रवेश अर्जांची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक निर्माते, दिग्दर्शकांबरोबरच कलाकार आणि तंत्रज्ञांनी त्याबाबत माहिती जाणून घेतली. अनेक तारे-तारकांच्या उपस्थितीत ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कलागुणांचा गौरव करणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा तसेच त्यांना प्रोत्साहन देणारा सोहळा म्हणून ‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कार सोहळ्या’ची ओळख आहे. यंदा या सोहळ्याचे तिसरे वर्ष असून मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अशा विविध विभागांत पुरस्कार दिले जाणार आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत रंगणारा हा धमाकेदार सोहळा मराठीतील एका मनोरंजन वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे. पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स या सोहळ्याचे मुख्य प्रायोजक आहे.

५ मार्चपर्यंत अर्ज करा
‘सकाळ प्रीमियर चित्रपट पुरस्कारा’साठी मागील वर्षी अर्थात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांचा विचार केला जाणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे आणि अर्ज डाऊनलोड करुन premierawardsakal23@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावे. नामवंत परीक्षकांचा चमू चित्रपटांचे परीक्षण करणार आहे. प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे.

प्रवेश अर्जासाठी येथे क्लिक करा