या मराठमोळ्या अभिनेत्रीला केली होती 'वन नाईट स्टँड'ची विचारणा

शुक्रवार, 5 एप्रिल 2019

ती म्हणाली, 'एका निर्मात्याने चित्रपटासाठी शरीरसुखाची मागणी माझ्याकडे केली होती. चित्रपटात काम करायचं तर अशी तडजोड करावी लागते, असे तो म्हणाला.

चित्रपटसृष्टी म्हटली की त्यासोबत अनेक मतं, वादविवाद, गॉसिप्स् हे आलेच. चित्रपटसृष्टीत येण्यासाठी, टिकण्यासाठी अभिनेता, अभिनेत्रींना बरेचवेळा तडजोड करावी लागली असल्याच्या चर्चा आपण ऐकतो. अशीच एक धक्कादायक माहिती एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पुढे आणली आहे. '
एका निर्मात्याने मला वन नाईट स्टँडसाठी विचारले होते. अभिनेत्री व्हायचे असेल तर या तडजोडी कराव्या लागतात, असे तो म्हणाला होता. पण मी त्याला सडेतोड उत्तर देत चित्रपटातून बाहेर पडले.' असा खुलासा अभिनेत्री श्रृती मराठे हिने केला आहे.

'ह्युमन ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने हा खुलासा केला. करियरच्या उमेदीच्या काळात तिला इंडस्ट्रीमध्ये आलेले काही अनुभव तिने शेअर केले. ती म्हणाली, 'एका निर्मात्याने चित्रपटासाठी शरीरसुखाची मागणी माझ्याकडे केली होती. चित्रपटात काम करायचं तर अशी तडजोड करावी लागते, असे तो म्हणाला. पण मी त्याला असे उत्तर दिले की, अभिनेत्री होण्यासाठी जर मला एखाद्याची शय्यासोबत करावी लागत असेल तर हिरो होण्यासाठी तुम्ही त्याला काय करायला सांगता? माझ्या खोचक प्रश्नाने तोही स्तब्ध झाला. माझ्या हितचिंतकांनी मला या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. एका मिनिटात घेतलेल्या या निर्णयाने मला धाडसी बनविले.'

मध्यंतरी एका दाक्षिणात्य चित्रपटातील श्रृतीचा बिकनी लूक व्हायरल झाला होता. तिला यावरुन सोशल मिडीयावर प्रचंड टोल केले गेले होते. याविषयी ती म्हणाली, 'मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, मी क्षणाचाही विचार न करता बिकनी घालायला तयार झाले. बिकनी बॉडी बनविण्यासाठी मी मेहनत घेतली होती. माझ्यावर त्यानंतर खूप टिका झाली. अशा प्रसंगामुळे तुम्ही मेहनतीने कमावलेली प्रतिष्ठा मातीमोल होते.'