Raavrambha: रायगडावर छत्रपतींचा आशीर्वाद घेत रावरंभांच्या टिमने 'या' पद्धतीने केलं पोस्टर लाँच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raavrambha, Raavrambha movie, Raavrambha full movie, Raavrambha music launch, Raavrambha full starcast, Raavrambha showtimings

Raavrambha: रायगडावर छत्रपतींचा आशीर्वाद घेत रावरंभांच्या टिमने 'या' पद्धतीने केलं पोस्टर लाँच..

Raavrambha Team at Raigad News: सध्या मराठी सिनेमांमध्ये नवीन सिनेमांची मांदियाळी आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित अनेक सिनेमे मराठी मनोरंजन विश्वात लोकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. अशाच एका सिनेमाची चर्चा आहे ती म्हणजे रावरंभा.

हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. आता रावरंभाच्या निमित्ताने अशीच एक ऐतिहासिक कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

(raavrambha marathi movie team poster launch at raigad chhatrapati shivaji maharaj)

रावरंभा सिनेमाचं प्रमोशन सध्या जोरात सुरु आहे. नुकतीच सिनेमाची टीम रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी गेली होती.

त्यावेळी सिनेमाच्या टीमने महाराजांच्या समाधी स्थळासमोर पोस्टर लाँच केलं. यावेळी सिनेमाचे प्रमुख कलाकार ओम भुतकर आणि मोनालिसा बागल उपस्थित होते. यावेळी सिनेमाच्या कलाकारांनी शिवाजी महाराजांना मनोभावे अभिवादन केले.

अनेकदा रणभूमीवर समशेर फिरवून शत्रूंना नामोहरम करणाऱ्या योद्धांची कथा आपल्याला माहित असते.

पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट क्वचित आपण ऐकतो.

कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे. स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट २६ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे.

रावरंभाची सिनेमाची गाणी गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत. या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे.

संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत. व्हिडिओ पॅलेसकडे चित्रपटाच्या गीताचे हक्क आहेत.

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे.

कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. २६ मे पासून 'रावरंभा' ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात बघायला मिळेल.