राझी : देशहितासाठी झगडणाऱ्या तरुणीची कथा 

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 12 मे 2018

"राझी' हा चित्रपटही सत्य घटनेवर आधारित आहे. सत्तरच्या दशकात एक काश्‍मिरी मुलगी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय गुप्तहेर बनते आणि पाकिस्तानातील एका लष्करप्रमुखाशी लग्न करते. तेथे गेल्यानंतरही ती आपल्या देशाशी आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहते.

वास्तववादी विषयावर चित्रपट बनविण्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील काही महिला दिग्दर्शकांचा चांगलाच हातखंडा आहे. अशा प्रकारचे विषय हाताळताना कोणती आणि कशी काळजी घ्यावी, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे साहजिकच वास्तववादी किंवा सत्य घटनेवर चित्रपट बनविताना अगदी बारीकसारीक गोष्टीचा साकल्याने विचार केला जातो. 

मेघना गुलजार ही अत्यंत हुशार आणि कल्पक दिग्दर्शिका आहे. वास्तववादी विषय हाताळण्यात ती चांगलीच वाकबगार आहे. तिच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांद्वारे ते सिद्ध झाले आहे. आता आलेला "राझी' हा चित्रपटही सत्य घटनेवर आधारित आहे. सत्तरच्या दशकात एक काश्‍मिरी मुलगी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारतीय गुप्तहेर बनते आणि पाकिस्तानातील एका लष्करप्रमुखाशी लग्न करते. तेथे गेल्यानंतरही ती आपल्या देशाशी आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहते. अर्थात एका वीस वर्षांच्या मुलीचा प्रवास आणि तिच्या जीवनात येणाऱ्या अनिश्‍चित घडामोडी या चित्रपटात टिपण्यात आल्या आहेत. रिटायर्ड नेव्ही ऑफिसर हरिंदर सिक्का यांच्या "कॉलिंग सेहमत' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. 

 raazi

चित्रपटाची कथा सुरू होते काश्‍मीरच्या हिदायत खान (रजत कपूर) आणि त्यांची पत्नी तेजी (सोनी राजदान) यांच्यासोबत. या दोघांची मुलगी सेहमत (आलिया भट) दिल्लीत शिकत असते. भारताचे गुप्तहेर प्रशिक्षणाचे प्रमुख खालिद मीर (जयदीप अहलावत) हिदायत यांचे चांगले मित्र असतात. देशाच्या हितासाठी हिदायत यांचे गुप्त माहिती योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम असते. एके दिवशी आपल्या देशाच्या रक्षणासाठी हिदायत कठोर निर्णय घेतात. सेहमत हिचे लग्न पाकिस्तानी लष्करप्रमुख इक्‍बाल (विकी कौशल) याच्याशी लावण्याचे ते ठरवितात. त्यानुसार सेहमतचे लग्न इक्‍बालशी होते आणि ती पाकिस्तानात भारतीय गुप्तहेर म्हणून जाते.

आपल्या जीवाची पर्वा न करता सेहमत तेथे गुप्तहेर म्हणून काम करीत असते. पाकिस्तानी आर्मीमध्ये चाललेल्या घडामोडी ती भारतीय आर्मीला देत असते. त्या वेळी तिला कोणकोणत्या परिस्थितीतून जावे लागते... तिच्यावर कोणते प्रसंग उद्‌भवतातस हेच या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. एका धाडसी व हुशार अशा एका भारतीय गुप्तहेर स्त्रीची कहाणी या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. तिची जिगर आणि हुशारी नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. 

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवरची ही कथा आहे. सेहमतची भूमिका आलिया भटने अत्यंत चपखलपणे साकारली आहे. या भूमिकेकरिता तिने घेतलेली मेहनत निश्‍चित जाणवते. अमृता खानविलकरने मुनिराची व्यक्तिरेखा सहजसुंदर साकारली आहे. तसेच अन्य कलाकारांनीही आपापल्या भूमिकाही छान केल्या आहेत. 
मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन अतिशय नेटके आहे. गुलजार यांच्या गाण्यांना शंकर-एहसान- लॉय यांनी दिलेला संगीतसाजही उजवा आहे. प्रसंगानुरूप ही गाणी आहेत. 

आपले देशप्रेम जागविणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण काश्‍मिरात झाले आहे. सिनेमॅटोग्राफर्सनी आपले काम चोख केले आहे. एक वीस वर्षांची कॉलेज युवती आपल्या जीवाची पर्वा न करता पाकिस्तानात जाऊन भारतासाठी अर्थात आपल्या देशासाठी गुप्तहेर बनते... आपले देशप्रेम आणि कर्तव्यापुढे अन्य गोष्टींचा त्याग करते, ही निश्‍चित दाद देण्याजोगी आणि विचार करायला लावणारी कथा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raazi movie review