राम कदम पुन्हा वादात; सोनाली बेंद्रेला वाहिली चक्क श्रध्दांजली!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

राम कदम यांनी त्याची कोणतीही शाहनिशा न करता थेट ट्विट करत सोनाली बेंद्रे हिला भावपूर्ण श्रध्दांजली दिली आहे. 

मुंबई : 'कोणती मुलगी आवडते सांगा, ती तुमच्यासाठी पळवून आणू...' असे वक्तव्य भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदमांनी दोन दिवसांपूर्वीच केले. ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. हा वाद अजून शमलाही नाही तर आणखी एक गंभीर चूक राम कदम यांनी केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या निधनाबाबत राम कदम यांनी ट्विट करत सोनालीला श्रध्दांजली वाहिली!

सोनाली सध्या कर्करोगाशी झुंज देत आहे. तिच्यावर न्युयॉर्क येथे उपचार सुरु आहेत. तिच्या उपचाराबाबत आणि या संघर्षाबाबत ती सतत सोशल मिडीयाद्वारे काहीना काही पोस्ट करत असते. कालच सोनालीने 'रीड बुक डे' निमित्त एका पुस्तकासोबत तिचा फोटो अपलोड केला होता. जो खुप व्हायरल झाला. सोनालीच्या मृत्यूबाबतची अफवा आज सगळीकडे पसरत असतानाच कदम यांनी त्याची कोणतीही शाहनिशा न करता थेट ट्विट करत सोनाली बेंद्रे हिला भावपूर्ण श्रध्दांजली दिली आहे. 

'हिंदी व मराठी सेनेसृष्टी मधली अभिनेत्री व एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्या आड.. यांचे अमीरेका येथे निधन झाले आहे..' असे राम कदम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हे ट्विट वाचून तरी हा अफवेचा व्हायरल मॅसेज जसच्या तसा कदम यांनी ट्विट केला आहे, असेच प्रथम दर्शनी दिसून येत आहे. 

ram kadam wrong tweet

या ट्विट नंतर सोशल मिडीयावर लोकांनी आणि मिडीयाने कदम यांच्यावर सडकून टिका केली आहे. हे ट्विट डिलीट करुन काही वेळातच राम कदम यांनी 'सोनाली बेंद्रे बाबत ती अफवा होती. मी दोन दिवसांपासून सोनाली जी यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे...' अशी सावरासावर करणारे ट्विट केले आहे.    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Kadam Pays Tribute To Actress Sonali Bendre On Twitter