जासूस रणबीर

ranbir kapoor interview
ranbir kapoor interview

बॉलीवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूर "जग्गा जासूस' या चित्रपटातून जासूस बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कसा साकारलाय त्याने हा जासूस आणि जग्गा जासूस हा चित्रपट कसा आहे. त्याविषयी... 

"जग्गा जासूस' या चित्रपटासाठी चाहत्यांना फार वाट बघावी लागली, असं का बरं? 
- हा चित्रपट गेली तीन ते साडेतीन वर्षे बनत आहे ही गोष्ट खरी; परंतु याला मुख्य कारण एक चांगला चित्रपट प्रेक्षकांसमोर ठेवावा हे होतं. संपूर्ण कुटुंबाने हा चित्रपट पाहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा चित्रपट बनवत होतो. तो बनवत असताना काही सम्या उभ्या राहिल्या हे खरंय.. परंतु दादा (अनुराग बसू), मी आणि आमच्या टीमने त्याच्यावर मात केली. मला असं वाटतं की, कोणताही चित्रपट तीन वर्षांमध्ये तयार व्हावा की तीन महिन्यांमध्ये... ही गोष्ट महत्त्वाची नाही; तर चित्रपट चांगला व्हावा ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याच गोष्टीचा विचार केला आणि एक चांगला चित्रपट बनवला. या चित्रपटाची निर्मिती मी आणि दादा दोघांनी मिळून केली आहे. चित्रपटाची निर्मिती मी पहिल्यांदाच करतोय. 

या चित्रपटाचं बरचसं रि-शूट झालं असंही ऐकलं. खरंय का? 
- रि-शूट जास्त काही झालं नाही. केवळ दहा दिवसांचं रि-शूट करण्यात आलं. त्यामुळे आमचंच नुकसान झालं. खरं तर जेव्हा हा चित्रपट सेटवर गेला तेव्हापासून या चित्रपटाबद्दल बऱ्याच अफवा पसरायला लागल्या. सगळीकडे उलटसुलट चर्चाही रंगली. कतरिना आणि मी एकत्र काम करू इच्छित नाही... आमच्या दोघांचं अजिबात पटत नाही... त्यामुळे दिग्दर्शकाला त्रास होतोय... कितीतरी अफवा होत्या त्या. परंतु तसं काही नव्हतं. आम्हाला चांगला चित्रपट बनवायचा होता म्हणून वेळ लागला आणि महत्त्वाचं म्हणजे दादाच्या कथेवर आमचा विश्‍वास होता. 

तीनेक वर्षांपूर्वी लिहिलेली ही पटकथा आता तेवढीच ताजी आणि टवटवीत वाटेल का? 
- हा चित्रपट नक्कीच सर्वांना आवडेल असाच आहे. बच्चे कंपनीसह सर्वांना तो आवडेल असाच आहे. जेव्हा दादांनी "बर्फी' चित्रपट बनवला आणि त्याबद्दल त्यांच्या दोन मुलींना त्यांनी विचारलं की कसा काय वाटला हा चित्रपट, तेव्हा त्यांनी "ठीक आहे...' असं काहीसं उत्तर अनिच्छेनेच दिलं आणि ती झोपी गेली. तेव्हाच दादाला कल्पना सुचली की आपल्याकडे लहान मुलं एन्जॉय करतील असे चित्रपट खूप कमी प्रमाणात बनत आहेत. त्यामुळे त्यांनी केवळ लहान मुलंच नाहीत तर संपूर्ण कुटुंब एन्जॉय करील असा चित्रपट बनवला आहे. मनोरंजनाबरोबरच हा चित्रपट सामाजिक संदेशही देणारा आहे. 

कतरिनाला आणि तुला एकत्र बघायला प्रेक्षकांना आवडतंच. कतरिनाबद्दल तू काय सांगशील? 
- कतरिना हुशार आणि कल्पक अभिनेत्री आहे. समोरच्या कलाकाराला ती नेहमीच प्रोत्साहन देत असते. ती नेहमीच सकारात्मक विचार करते. सेटवर ती सगळ्यांशी अगदी हसतखेळत वावरते. या चित्रपटातील तिची भूमिका निराळी आहे. तिची भूमिका विनोदी ढंगाने पुढे जाणारी आहे. ती या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारीत आहे. एका प्रोजेक्‍टसाठी ती आमच्या गावात येते. तेथे तिची व माझी भेट होते. पहिल्यांदा भेट आणि नंतर मैत्री... तिच्यामुळेच चित्रपट काहीसा खुसखुशीत झाला आहे, असं मला वाटतं. 

निर्माता बनण्याचा विचार का केलास ? 
- दादांबरोबर "बर्फी' चित्रपट केला तेव्हा त्यांचं आणि माझं चांगलं ट्युनिंग जमलं. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. यानंतर आता अयान मुखर्जींबरोबरही एका चित्रपटाची निर्मिती करणार आहे. त्याची व माझी चांगली मैत्री आहे. त्यामुळे आता यापुढे दादा आणि अयानबरोबर चित्रपट काढणार आहे. आता मी निर्माता बनलो असलो तरी दिग्दर्शक बनण्याचा माझा नक्कीच विचार आहे. जेव्हा दिग्दर्शक बनेन तेव्हा पहिला चित्रपट आर. के. बॅनर्सचाच दिग्दर्शित करीन. आर. के. बॅनर्सची पताका पुन्हा मला फडकवायची आहे. सध्या मला योग्य अशी कथा मिळत नाहीय. ती मिळाली की तो चित्रपट आर. के.चा असेल आणि त्याचा दिग्दर्शक मी असेन. 

शाळेत असताना तू किती हुशार होतास आणि मस्ती करायचास का? 
- आमच्या कपूर कुटुंबात मी जास्त शिकलेलो आहे. माझे वडील आठवी पास; तर आजोबा अर्थात राज कपूर सहावी पास होते. मी अभ्यासात तसा कमजोर होतो. परंतु नापास कधी झालो नाही. शाळेत माझी आई यायची आणि कमी मार्क मिळालेले तिने पाहिलं की आता मी सही करणार नाही. बाबांची सही तुला घ्यावी लागेल, असं सांगून मला घाबरवायची. मग मी चक्क रडायचो. कारण मला बाबांची खूप भीती वाटायची. परंतु शाळेत शेवटच्या दहा क्रमांकामध्ये मी नक्कीच असायचो. 

तुझ्या करिअरमध्ये बरेच चढ-उतार आले आहेत त्याबद्दल... 
- यहॉं चढते सूरज को सलाम करते है लोग... याचा मला खूप चांगलाच अनुभव आला. गेल्या तीनेक वर्षांमध्ये मी जे काही सोसलंय, ते माझं मलाच माहीत. बरंच काही शिकलोय त्यातून. यशाने कधी हुरळून गेलो नाही आणि अपयशाने खचलो नाही. उलट माझ्या कामावर मी अधिक लक्ष केंद्रित केलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com