अपना टाईम आ गया; 'गली बॉय' निघाला ऑस्करला!

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गली बॉय़' ची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे.

मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गली बॉय़' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला गेला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (एफएफआय) कडून आज (ता.21) याची घोषणा करण्यात आली.  

या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केलं आहे. स्ट्रीट रॅपरचा संघर्ष यामधून दाखविण्यात आला आहे. मुंबईतल्या धारावीमध्ये राहणाऱ्या मुरादच्या संघर्षाची ही कहाणी आहे. याच वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रणवीर आणि आलियासोबत विजयराज, कल्की केकला, सिद्धांत चतुर्वेदी, विजय शर्मा आणि अमृता सुभाष ही मंडळी मुख्य भूमिकेत दिसली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 140 कोटींचा गल्ला जमा केला होता. 

'एफएफआय'चे महासचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी एकूण 27 सिनेमे ऑस्करच्या शर्यतीत होते. मात्र, त्यामधून एकमताने गली बॉयची निवड करण्यात आली. या शर्यतीमध्ये उरी- द सर्जिकल स्ट्राइक, केसरी, बधाई हो, आर्टिकल 15 आणि अंधाधून या चित्रपटांचा समावेश होता. 

'बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर करण्यात आला होता. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न (आईएफएफएम) मध्येही 'गली बॉय' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 

Image may contain: 2 people, text

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer Singh and Alia Bhatt film Gully Boy is in Indias Oscars 2020 entry