रिव्ह्यु: 'एक थी बेगम' वेबसिरीज

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

एखाद्या वेबसीरिजचे पोस्टर्स किंवा त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याबाबतीत खूप उत्सुकता वाढते आणि त्याबाबतीत कमालीची उत्कंठा वाढत जाते. एमएक्स प्लेअरवर आलेली 'एक थी बेगम' या वेबसीरिजमध्ये हातात बंदूक असलेले अभिनेत्री अनुजा साठेचे पोस्टर्स लाँच झाले.

मुंबई - एखाद्या वेबसीरिजचे पोस्टर्स किंवा त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर त्याबाबतीत खूप उत्सुकता वाढते आणि त्याबाबतीत कमालीची उत्कंठा वाढत जाते. एमएक्स प्लेअरवर आलेली 'एक थी बेगम' या वेबसीरिजमध्ये हातात बंदूक असलेले अभिनेत्री अनुजा साठेचे पोस्टर्स लाँच झाले. त्यावेळी ही एका महिलेच्या धाडसाची आणि सूडाची कथा असणार असा अंदाज बांधला गेला होता आणि ही वेबसीरिज पाहिली असता तिच्या साहसाने कमाल केली आहे.

हे ही वाचा: डान्सच्या अदांनी घायाळ करणारी उर्वशी 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीच्या मदतीने देतेय अभिनयावर जोर

खरे तर ही वेबसीरिज सत्य घटनेवर प्रेरित आहे. १९८६-९० या कालावधीतील ही कथा आहे. सपनादीदी ही सर्वसामान्य घरातील महिला.  दिग्दर्शक सचिन दरेकरने या सपनादीदीच्या तिच्या धाडसाची आणि साहसाची ही कथा सत्य घटनेवर प्रेरित होऊन लिहिली असून ती दिग्दर्शित केली आहे. खरे तर एखाद्या सत्य घटनेवर प्रेरित होऊन चित्रपट किंवा वेबसीरिज काढणे मोठे धाडसाचे आणि जोखमीचे काम असते.  सत्य घटनेवर प्रेरित होऊन काही करताना थोड्या प्रमाणात सिनेमँटिक लिबर्टी घ्यावी लागते. कारण ती ड्राय होऊ नये व प्रेक्षकांना पाहताना बोअरिंग होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.

सचिन दरेकरने ही कथा मांडताना ती अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक कशी होईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे. ही कथा आहे अश्रफ भाटकर (अनुजा साठे) ही सर्वसामान्य कुटुंबातील महिला. ती आपले सासू-सासरे आणि नवऱ्याबरोबर राहात असते. तिचा पती झहीर भाटकर (अंकित मोहन) हा गँगस्टर असतो. दुबईतील डॉन मकसूद (अजय गेही) तसेच अन्य लोकांबरोबर त्याची उठबस असते. दुसरीकडे नाना म्हात्रे (राजेंद्र शिसाटकर) हा मोठा गँगस्टर असतो. त्याचा शहरात तसेच पोलिस ठाण्यात मोठा दबदबा असतो. सावत्या (संतोष जुवेकर) हा गँगस्टर त्याचा खास माणूस. शहरातील पोलिस अधिकारी तावडे (अभिजित चव्हाण) नानाच्या तालावर नाचणारा असतो. नानाचा भाऊ रघू (अमित राज)चा वाढदिवस असतो. नाना तो मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतो आणि अशा वेळीच रघूची हत्या होते. झहीर रघूची हत्या करतो ही बाब नानाला समजते. रघू नानाचा अत्यंत लाडका भाऊ असल्यामुळे नाना त्वेषाने आणि रागाने वेडापिसा होतो. झहीरला संपविण्याचा तो विडाच उचलतो आणि एके दिवशी झहीरची हत्या होते...त्यानंतर अश्रफ कोणते निर्णय घेते...

कुणाकुणाला भेटते हे वेबसीरिज पाहिल्यानंतर समजेल. अत्यंत थरारक आणि रोमांचक अशी ही कहाणी आहे आणि तिला लेखक व दिग्दर्शक सचिन दरेकरने योग्य अशी ट्रीटमेंट दिली आहे. या वेबसीरीजमध्ये अनुजा साठे, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, राजेंद्र शिसाटकर, अभिजित चव्हाण, प्रदीप डोईफोडे, विठ्ठल काळे, विजय निकम, अनिल नगरकर, संतोष जुवेकर, रेशम, नाझर खान, अजय गेही, राजू आठवले आदी कलाकारांनी काम केले आहे. सगळ्याच कलाकारांनी सहजसुंदर अभिनय केला आहे. मात्र कमाल केली आहे ती नाना म्हात्रेची भूमिका साकारणाऱ्या राजेंद्र शिसाटकर यांनी तसेच अनुजा साठेने.

राजेंद्रचा अभिनय अफलातून झाला आहे तसेच अनुजा साठेने आपल्या भूमिकेमध्ये खूपच व्हरायटी दिली आहे. एक सर्वसामान्य घरातील गृहिणी पतीच्या निधनानंतर बदला घेण्यासाठी गुन्हेगारी जगताशी जोडली जाते. थेट मोठ्या गँगस्टरला आव्हान देते...मुळात ही भूमिका खूप आव्हानात्मक होती. कारण या भूमिकेला विविध पदर होते आणि ही सगळी जबाबदारी अनुजाने उत्तम पार पाडली आहे. नव्वदच्या दशकातील काळ कलादिग्दर्शकाने उत्तम उभारला आहे आणि त्याला सिनेमॅटोग्राफर्सने आपल्या कॅमेऱ्यात छान टिपले आहे. एकूणच एका महिलेच्या सूडाची आणि तिच्या अस्तित्वाची लढाई पाहावी अशीच आहे. चौदा भागांची ही वेबसीरीज एमएक्स प्लेअरवर नक्की पाहा.

ek thi begam read full web series review


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: read full review of ek thi begam web series