Ashwini-Kasar
Ashwini-Kasar

अभिनेत्री अश्विनी कासार काय म्हणते वाचा

Published on

सेलिब्रिटी टॉक - अश्विनी कासार, अभिनेत्री 
रुईया महाविद्यालयात शिकत असतानाच मला अभिनयाचे वेड लागले. एकांकिकेपासूनच मी अभिनय क्षेत्रात रमत गेले. मला हे क्षेत्र अधिक आवडत होते. मी रुईयामध्ये बी.ए. पूर्ण केले. अभिनयाव्यतिरिक्त मला अधिक शिक्षण घ्यायचीही इच्छा होती. म्हणून मी बी.ए. झाल्यानंतर लॉ करायचे ठरवले. त्यासाठी प्रवेशही घेतला. लॉ केल्यानंतर ‘मास्टर्स इन लॉ’ केले. हे शिक्षण घेत असताना नाट्यक्षेत्रामधून जवळपास दूर झाले होते. माझे क्षेत्रच पूर्णपणे बदलले होते. यादरम्यान फक्त नृत्याचे वर्ग सुरू ठेवले होते. नृत्याच्या निमित्ताने तेव्हा स्टेजवर मला माझी कला सादर करण्याची संधी मिळत होती.

उच्च न्यायालयात एका प्रसिद्ध वकिलाकडे प्रॅक्‍टिसही करत होते; पण उच्च न्यायालयात फारसे मन रमले नाही. अभिनय क्षेत्राशी जोडली गेलेली नाळ स्वस्थ बसू देत नव्हती. तिथेच प्रॅक्‍टिस करत असतानाच मला ‘कमला’ या मालिकेसाठी विचारण्यात आले. पुन्हा एकदा अभिनयाकडे वळण्याचा मार्ग मला ‘कमला’मुळे मिळाला. पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळायचे म्हणजे मला उच्च न्यायालयामध्ये जाणेही बंद करावे लागणार होते. इतके शिक्षण घेतले असताना आपण आपल्या करिअरची दिशाच बदलावी का, हा मोठा प्रश्‍न होता. तेव्हा मी द्विधा मनःस्थितीमध्ये होते. माझ्या आयुष्यामधील हा टर्निंग पॉइंट होता. मला मालिका करायची आहे, असे मी घरी सांगताच कुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला. करिअर निवडायचे स्वातंत्र्य दिले. म्हणूनच नव्या जोमाने मी कलाक्षेत्रात काम करू शकले. ‘कमला’ मालिकेसाठी माझी निवड झाली. या मालिकेमुळे मी घराघरात पोचले. प्रेक्षकांकडून माझ्या कामाची पोचपावती मिळाली होती.

‘कमला’नंतर मला खरा स्ट्रगल करावा लागला. ‘कमला’आधी मी ऑडिशन्ससाठी नकार द्यायचे; पण या मालिकेनंतर मला बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्स द्याव्या लागल्या. माझ्याकडे यादरम्यान काही कामही नव्हते. आता आपण पुढे काय करायचे, हा प्रश्‍न सतत मला भेडसावत होता. अशातच मला नाटक करण्याची संधी ‘भद्रकाली’ने दिली. ‘सोयरे सकळ’ या व्यावसायिक नाटकात मी काम केले. पण, आपल्याकडे काम नाही म्हणून मी कधीच खचून गेले नाही. वकिलीचे शिक्षण घेत असताना मला बऱ्याच चांगल्या गोष्टीही शिकायला मिळाल्या आणि त्याचा उपयोग मला कला क्षेत्रात काम करीत असताना झाला आणि आजही होतो. ‘कट्टी बट्टी’सारखी मालिकाही मी केली. मालिकांमुळेच मी कलाकार म्हणून घडत गेले.

नाटक, मालिका करीत असताना बऱ्याच नवनवीन गोष्टी मला आत्मसात करता आल्या. आता छोट्या पडद्यावर एक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘सावित्रीजोती’ ही मालिका सुरू होत आहे. या मालिकेमध्ये मी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे. खरे सांगायचे, तर आजवर मी शालेय पुस्तकांमध्येच सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वाचले होते. पण, या मालिकेमुळे मी खऱ्या अर्थाने सावित्रीबाई यांच्याबाबत वाचायला सुरुवात केली. शिक्षण क्षेत्रामधील त्यांचे कार्य पाहून मी थक्क झाले. ही भूमिका माझ्या वाट्याला आली, यासाठी मी स्वतःला फार भाग्यवान समजते. ही भूमिका छोट्या पडद्यावर जिवंत करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीत आहे. ओमकार गोवर्धन या मालिकेमध्ये महात्मा फुले यांची भूमिका साकारत आहे. ओमकारबरोबर काम करण्यातही एक वेगळीच मजा आहे. या मालिकेच्या निमित्ताने एक वेगळीच अश्‍विनी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
(शब्दांकन - काजल डांगे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com