कोल्हापुरात चित्रित ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ अमेरिकेत साठ ठिकाणी प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

‘रिमेंबर ॲम्नेसिया’ आता संपूर्ण अमेरिकेत एकाच वेळी तब्बल साठ ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूर येथील लोकेशन्सचे आणखी मार्केटिंग होणार आहे. त्यामुळे चित्रीकरण आणि एकूणच अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
- आनंद काळे, अभिनेता

कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६० ठिकाणी आज (ता.१४) पासून प्रदर्शित होणार आहे. 

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. रवी गोडसे यांचा हा चित्रपट असून, दोन वर्षांपूर्वी या चित्रपटातील काही प्रसंगांचे चित्रीकरण कोल्हापूर परिसरात झाले. डॉ. गोडसे यांचे लेखन व दिग्दर्शन असून, पॉल ग्रेग, कॅरॉल शाईन, कॅरी ओरेली, पीटर सिल्बरमन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. जेम्स हॅरिसन, सर्टिस कुक, लिसा वॉल्टर, रॉनडेल शेरिडन, तोवाह फेल्डशू यांच्यासह मराठीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, महेश मांजरेकर, श्रुती मराठे, मेधा मांजरेकर, जयंत वाडकर, विजय पाटकर, लोकेश गुप्ता आणि येथील अभिनेता आनंद काळे, प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सूरज पवार यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. 
डॉ. गोडसे अमेरिकेत चाळीस वर्षे स्थायिक आहेत.

एरवी हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात; मात्र हॉलिवूडचा चित्रपटच चित्रीकरणासाठी कोल्हापुरात आला. वैद्यकीय व्यवसायातील विविध अनुभवांवर हा चित्रपट बेतला असून, कथानकात काही प्रसंग भारतात घडतात. त्याचे चित्रीकरण येथे महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसने यशस्वी केले. मे २०१८ मध्ये या चित्रपटाचा टिझर लाँच झाला होता; मात्र चित्रपट प्रदर्शित कधी होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

‘रिमेंबर ॲम्नेसिया’ आता संपूर्ण अमेरिकेत एकाच वेळी तब्बल साठ ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने येथील लोकेशन्सचे आणखी मार्केटिंग होणार आहे. त्यामुळे चित्रीकरण आणि एकूणच अर्थकारणाला चालना मिळणार आहे.
- आनंद काळे,
अभिनेता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remember Amnesia release