'काला' - रजनीकांत आणि नानासाठी...

हेमंत जुवेकर
शनिवार, 9 जून 2018

हा सिनेमा गरिबांची आणि गरिबीची भलावण करणारा आहे. यातलं साऊथ कनेक्‍शन थेटपणे अगदी गावाच्या नावासह येतं. धर्माचे उल्लेखही तसे उघडच आहेत.

रजनीकांतचे सिनेमा केवळ त्याचेच असतात. त्याचे ‘अंधभक्त’ असं सांगतात की त्याच्या सिनेमात तो सारा पडदा व्यापून वर दशांगुळे उरलेला असतो. हा सिनेमापण तसाच आहे; मात्र यातला रजनीकांत नेहमीसारखा स्टाईलाज्ड नाही. बहुतांश संयत आहे. त्याचं दिसणंही प्रत्यक्षातल्या रजनीच्या जवळ जाणारं आहे. (क्‍लायमॅक्‍सला तो नेहमीचा हिरो रजनीही दिसतोच म्हणा!) रजनीकांतचा राजकारणप्रवेश डोळ्यासमोर ठेवून त्याच्या प्रतिमासंवर्धनासाठी हा सिनेमा आला असावा, अशी शंका घ्यायलाही वाव आहे. (त्याचा जावई धनुष हाच निर्माता आहे याचा.) पण, तरीही यातल्या रजनीसमोर नाना ठामपणे उभा राहिलेला दिसतो, सिनेमा संपल्यावर तो जास्त लक्षात राहतो.

 kaala

धारावीच्या झोपडपट्टीवर असला तरीही हा ‘लार्जर दॅन लाईफ’ आहे; कारण यात ‘रजनी थैलैवा’ आहे. त्याची भूमिका अर्थातच कालाची. त्याच्यासोबत त्याची (म्हणजे कालाची) मुलं, सुना, नातवंडं, त्याची बायको आणि एकेकाळची बायको होता होता राहिलेली त्याची प्रेयसीही आहे!

मुंबईच्या मोठ्या भूभागावर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीविषयी खरंतर झोपडपट्टीखाली असलेल्या जमिनीबाबतची ही कथा आहे. त्यातला संघर्ष अर्थातच झोपडीवासीय आणि त्यांच्या झोपड्यांच्या जागी टोलेजंग इमारती बांधून तितकाच टोलेजंग नफा आपल्या खिशात टाकू पाहणारे राजकारणी-बिल्डर्स यांच्यातला आहे. यात रजनीकांत अर्थातच झोपडीवासीयांच्या बाजूचा. त्यामुळे सारा चित्रपट त्याच दृष्टिकोनातून आहे. मूळ चित्रपट दाक्षिणात्य असल्याने थोडा... थोडा कसला बराच लाऊड आहे. दिग्दर्शक रंजीथने यात अनेक चमकदार प्रसंग मांडलेत. पाहताना छानच वाटतात ते; पण नुसते सिन्स चमकदार असून नाही ना चालत, ते सिनेमाला एकसंधपणे पुढे घेऊन जायला हवे; पण तसं होताना मात्र दिसत नाही. 

हा सिनेमा गरिबांची आणि गरिबीची भलावण करणारा आहे. यातलं साऊथ कनेक्‍शन थेटपणे अगदी गावाच्या नावासह येतं. धर्माचे उल्लेखही तसे उघडच आहेत. क्‍लायमॅक्‍सला प्रत्येक वेळी पूर्ण फ्रेम व्यापणारे (काळा, निळा आणि लाल हे) रंग दिसण्यामागेही काहीतरी कारण असावं, असं जाणवतंच. चित्रपटाचं सादरीकरण चांगलं आहे. निर्मिती अतिशय श्रीमंत आहे. धारावी असली तरी ती पडद्यावर देखणी दिसते. (इफेक्‍टचीही मदत त्यासाठी घेण्यात आलीय) चित्रपटातली गाणी फार लक्षात राहणारी नसली तरी पार्श्‍वसंगीत मात्र उत्तमच आहे.

रजनीच्या फॅन्ससाठी हा सिनेमा पाहणं मस्ट आहेच; पण त्यातले अनेक रजनीफॅन या सिनेमानंतर नाना पाटेकरांचेही पंखे होतील इतकं उत्तम काम नानानी केलंय. विशेषतः आपल्या घरी आलेल्या रजनीला नाना सांगतो, ‘तुझी बायको आणि मुलगा मारली गेली, सॉरी बरंका, पण त्यांना मारायचं नव्हतंच मला. मला मारायचं होतं ते तुला’ इतक्‍या थंडपणे, शांतपणे तो सांगतो की अंगावर सर्रकन काटाच यावा. त्यामुळे रजनीचा हा सिनेमा नानासाठीही पहावा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: review of hindi film kaala