एक जुळून आलेली सुखद भेट; 102 नॉट आऊट 

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 5 मे 2018

तरल आणि हळुवार अशी ही कथा आहे आणि ती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. 102 वर्षांचा दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) आणि त्यांचा 75 वर्षांचा मुलगा बाबूलाल (ऋषी कपूर) यांची ही कथा आहे.

"कभी कभी', "अजुबा', "नसीब' अशा काही चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनी एकत्रित काम केले आहे. कधी एकमेकांचे जीवलग मित्र तर कधी भाऊ असे त्यांचे नाते चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलेले आहे. आता तब्बल 27 वर्षांनी हे दोन कलाकार "102 नॉट आऊट' या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी बाप आणि मुलाची भूमिका साकारली आहे.

तरल आणि हळुवार अशी ही कथा आहे आणि ती नक्कीच विचार करायला लावणारी आहे. 102 वर्षांचा दत्तात्रय वखारिया (अमिताभ बच्चन) आणि त्यांचा 75 वर्षांचा मुलगा बाबूलाल (ऋषी कपूर) यांची ही कथा आहे. दोघेही एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. दत्तात्रय वखारिया हे आपलं आयुष्य कसं आनंदात जगता येईल हे पाहत असतात. त्यांना जगातला सगळ्यात जास्त काळ जगलेला माणूस म्हणून रेकॉर्ड बनवायचा असतो; तर त्यांचा मुलगा बाबूलाल हा त्याच्या भूतकाळातच रमलेला असतो. 

102 not out

एक दिवस अचानक दत्तात्रय वखारिया त्यांच्या मुलाला वृद्धाश्रमात पाठविण्याचा निर्णय घेतात; पण बाबूलाल त्याला विरोध करतो. मग दत्तात्रय त्याला वृद्धाश्रमात न पाठविण्यासाठी पाच अटी घालतो. ज्या त्याला सहा महिन्यांत पूर्ण करायच्या असतात; पण हा सगळा त्यांच्यासाठी फक्त एक खेळ असतो. खरे तर दत्तात्रयला बाबूलालची जीवनशैली बदलायची असते. भूतकाळात रमलेल्या बाबूलालला आताची परिस्थिती काय आहे... त्याला कशाप्रकारे तोंड दिले पाहिजे... हे दत्तात्रयला सांगायचे असते. मग बाबूलाल त्या अटी पूर्ण करतो का... आपल्या भूतकाळातून तो बाहेर येतो का... वगैरे प्रश्‍नांची उत्तरे या चित्रपटात दडलेली आहेत. 

दिग्दर्शक उमेश शुक्‍ला यांनी एका गुजराती नाटकावरून "ओह माय गॉड' हा चित्रपट बनविला होता. तो चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगला चालला होता. "102 नॉट आऊट' हा चित्रपटही गुजराती नाटकावर आधारित आहे. परदेशात राहणाऱ्या आपल्या मुलांसाठी त्यांचे आई-वडील त्यांची किती आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांच्या भेटीची त्यांना कशी ओढ लागलेली असते यावर खरमरीत भाष्य करणारा हा चित्रपट आहे. परदेशी राहणारी मुले आपल्या वृद्ध आई-वडिलांबद्दल किती गंभीर असतात किंवा त्यांना कशा प्रकारची वागणूक देतात यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटात कोणतेही आयटम सॉंग नाही. चित्रपटात थरारक अशी ऍक्‍शन नाही. चित्रपटात कोणतीही प्रसिद्ध नायिका नाही. तरीही हा चित्रपट केवळ आणि केवळ त्याच्या हलक्‍याफुलक्‍या कथानकाद्वारे खिळवून ठेवतो. 

अमिताभ बच्चन यांनी 102 वर्षांच्या वृद्धाची भूमिका लीलया पेलली आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल किती बोलावे आणि सांगावे तेवढे थोडे आहे. ऋषी कपूरनेही 75 वर्षांच्या वृद्धाची भूमिका सहजरीत्या साकारली आहे. त्यांची रुपेरी पडद्यावरील बाप आणि बेटा यांची केमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. जणू काही आपण आपल्याच आसपास कुठे तरी अशी जोडी पाहतोय असेच वाटत राहते. दिग्दर्शक उमेश शुक्‍लाने बाप आणि मुलांमधील गमतीजमती... त्यांच्यातील थट्टामस्करी...त्यांच्यातील राग आणि प्रेम छान पडद्यावर मांडले आहे, सलीम-सुलेमान यांचे संगीत चांगलेच जुळून आले आहे. काही अपवाद सोडले तर चित्रपट नक्कीच संपूर्ण कुटुंबाने पाहावा असाच आहे. कारण सध्या हिंदी चित्रपटांचा ट्रेण्ड बदलत चाललेला आहे. तद्दन मसाला चित्रपटांबरोबरच काहीतरी विचार देणारे आणि आजच्या पिढीला काही तरी सांगणारे चित्रपट येत आहेत. हा चित्रपट त्याच पठडीत बसणारा आहे. एकूणच कलाकार, दिग्दर्शक आणि सुंदर कथेची ही जुळून आलेली प्रेक्षकांसाठीची सुखद भेटच आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: review of hindi movie 102 not out